‘सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव’ यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य : एकनाथ शिंदे

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्‍तसेवा : सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवातून पर्यावरण रक्षणाच्या चळवळीचा प्रारंभ होईल. या लोकोत्सवाच्या नियोजनात कुठलीही कमतरता राहणार नाही. यात शासनाचे विविध विभाग सहभागी होतील. लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ येथे होणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवाच्या नियोजनाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्याचे मुख्य सचिव मनु कूमार श्रीवास्तव, आमदार महेश शिंदे, विविध विभागांचे सचिव, या लोकोत्सवाचे संकल्पक कणेरी येथील सिद्धगिरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्यासह, संयोजन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते.

कणेरी मठ (ता. करवीर) येथे २० ते २६ फेब्रुवारी २०२३ दरम्यान लोकोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये विविध परिषदा, प्रदर्शने आणि चर्चासत्र-परिसंवाद यांचे आयोजन करण्यात येणार आहेत. पंचमहाभूत लोकोत्सवाच्या नियोजनासाठी पर्यावरण विभाग समन्वयक काम करेल. पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे नोडल अधिकारी म्हणून काम करतील. त्यांना सर्व विभाग सहकार्य करतील, असे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पर्यावरणीय समतोल विषयी जनजागृती ही काळाची गरज आहे. समाजाची गरज आहे. अतिवृष्टी, बर्फ वितळणे या गोष्टी आपण अनुभवतो आहोत. त्यामुळे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी ही गरज ओळखून या लोकोत्सवाचे नियोजन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पर्यावरण रक्षणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. भारतात जी-२० परिषद होत आहे. या परिषदेचे बोधवाक्यही वसुधैव कुटुम्बकम् असे आहे. भगवान श्रीकृष्ण यांनीही आपल्याला हीच शिकवण दिली आहे. त्यामुळे पंचमहाभूत लोकोत्सव आणि जी-२०चे आयोजन हा योगही जुळून आला आहे. स्वामीजींच्या नियोजनाची, तयारीची चुणूक बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी अनुभवली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, आज या विषयाचे गांभीर्य आपण पाहिले तर संपूर्ण जग ज्या विषयावर विचार करते अशा पर्यावरण संतुलनाच्या विषयावर हा लोकोत्सव होत आहे.  हा विषय सर्वसामान्यांपर्यंत या उत्सवाच्या माध्यमातून पोहोचेल, महाराष्ट्र शासनाने या लोकोत्सवासाठी विविध विभागांच्या माध्यमातून तयारी केली आहे.

कणेरीमठाच्या वतीने आयोजित 'लोकोत्सव' नक्कीच यशस्वी होईल, असा मला विश्वास आहे. हा लोकोत्सव असल्यामुळे महाराष्ट्र शासनाचा या उत्सवात सहभाग आहेच, या लोकोत्सवासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यात येईल, अशी ग्वाही देखील उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.

यावेळी कृषी, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पशुसंवर्धन, आरोग्य, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, ऊर्जा विभाग यांच्या सहभागाबाबत बैठकीत माहिती देण्यात आली. सुरुवातीला अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांनी प्रास्ताविक केले. प्रधान सचिव दराडे यांनी पुर्वतयारीबाबत सादरीकरण केले.

पंचमहाभूत लोकोत्सवाची व्यापकता 

सात दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवात एकूण सात विषय ,२५ पेक्षा जास्त राज्यातील लोकांचा सहभाग, ५० पेक्षा जास्त देशातील प्रमुख पाहुणे ,विविध जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त संस्थांचा सहभाग,५०० हून अधिक कुलगुरुंची उपस्थिती, हजारहून अधिक साधू संतांचा सहवास , १५०० शेती अवजारे व इतर वस्तूंची दालने, दहा हजार व्यावसायिकांचा सहभाग , ६५० एकर विस्तीर्ण परिसरात लोकोत्सव होणार आहे. त्यामध्ये २ लाख चौरस फूट जागेत मनोरंजन जत्रा, ३ लाख चौरस फूट जागेवर थ्री डी मॉडेल्स ची मांडणी केली जाईल. सुमारे ४० लाख लोक या पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होतील, असे नियोजन असल्याची माहिती  संयोजकांनी दिली.

.हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news