पिंपरी: इंद्रायणी थडी जत्रेत नवोदितांना मिळणार संधी, 25 तारखेपासून नियोजन; पाच हजारांपेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज | पुढारी

पिंपरी: इंद्रायणी थडी जत्रेत नवोदितांना मिळणार संधी, 25 तारखेपासून नियोजन; पाच हजारांपेक्षा अधिक इच्छुकांचे अर्ज

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील सर्वांत मोठी असा लौकिक प्राप्त असलेल्या इंद्रायणी थडी जत्रेत स्टॉल नोंदणीसाठी तब्बल 5 हजारांहून अधिक इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत. भोसरी येथे 25 तारखेपासून पुढील पाच दिवस ही जत्रा चालणार आहे. या जत्रेत नवोदित कलाकारांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

महिला सक्षमीकरण उद्योजकता विकास आणि नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून ही जत्रा भरविण्यात येते. शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या जत्रेचे आयोजन केले जाते. जत्रेमध्ये ग्राम संस्कृती, धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक दस्तावेज प्रदर्शन, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कलाकृती यासह नवोदित कलावंतांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

विविध प्रकारातील शंभरहून अधिक मनोरंजन प्रबोधन आणि आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. जत्रेत 800 स्टॉल उभारण्यात येणार आहे. राज्यभरातून सुमारे 25 लाखाहून अधिक नागरिक जत्रेला भेट देतील, अशी अपेक्षा समन्वयक संजय पटनी यांनी व्यक्त केली आहे.

40 प्रकारच्या विविध स्पर्धा

पिंपरी-चिंचवड शहर आणि राज्यभरातील नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने यंदा इंद्रायणी थडी जत्रेमध्ये सुमारे 40 प्रकारच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे कलाक्षेत्रातील संस्था अथवा व्यक्ती कला-कौशल्यांच्या स्पर्धा घेण्यात इच्छुक असेल, तर जत्रा संयोजकांकडून पुरेशी जागा, स्टेज, ब्रॅण्डिंग, प्रशस्तीपत्रक, बक्षिसे, प्रमुख पाहुणे यांचे नियोजन करून देण्याची तयारी संयोजकांनी ठेवली आहे. केवळ स्पर्धेचे नियोजन आणि परीक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असलेल्या संस्था अथवा व्यक्तींनी अमोल देशपांडे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button