

पुढारी ऑनलाईन डेस्क: #यूपीएससी म्हणजे जीवनाचे अंतिम ध्येय नाही, त्यामुळे अपयश आले असले तरी प्लॅन बी चा विचार करून जोमाने तयारी करा. स्वानुभवाने सांगतो यूपीएससी आणि एमपीएससी म्हणजे आयुष्य नव्हे, असा कानमंत्र उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिला आहे.
शुक्रवारी #यूपीएससीचा निकाल लागला असून त्यात महाराष्ट्रातील अनेक तरुण-तरुणींनी यश मिळविले आहे. मात्र, अनेकांना अपयशही आले आहे. या मुलांना दिवेगावकर यांनी सल्ला दिला आहे. दिवेगावकर हे नेहमीच स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना वास्तव सल्ला देत असतात.
काल निकाल लागल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली असून त्यात म्हटले आहे, 'इथून पुढची परीक्षा रोजची आहे. संविधानाचे पालन करण्याची शपथ निभावणे ही एक मोठी परीक्षा आहे. वैयक्तिक यशानंतर आपल्या सामाजिक यशाकडे जाण्याची परीक्षा आहे.
अपयशी ठरलेल्या सर्वांना सांगणे की प्लॅन बी चा विचार करून पुन्हा जोमाने तयारी करा. तरीही स्वानुभवाने सांगतो #यूपीएससी आणि एमपीएससी म्हणजे आयुष्य नाही. लोकांच्या यशाच्या तथाकथित व्याख्या नाकारून आपल्या पायावर उभे राहणे चांगला माणूस बनणे हेच सर्वोच्च यश आहे. महाराष्ट्राचा टक्का यावेळी थोडा घसरला आहे. पुढल्या वर्षी ही कसर भरून निघेल अशी अपेक्षा आहे.
निकाल लागण्यास उशीर झाल्याने तणावग्रस्त स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. त्यानंतर दिवेगावकर यांनी एक पोस्ट केली होती.
त्यात म्हटले होते. 'मी माझा #यूपीएससीचा निकाल लागल्यापासून एक तत्व पाळत आलोय. शक्यतो भाषणबाजी करायची नाही. अभ्यासाबद्दल बोलायचे. विद्यार्थ्यांना वास्तवाचे भान असले पाहिजे. आयएसएस होणे एक मोठी संधी आहे; पण ती संधी सर्वोच्च नाही. आपण कोणीही हिरो नाहीत. आणि एक टक्क्यांहून कमी निकाल असणाऱ्या परीक्षेत ९९ लोकांचे काय?
हा प्रश्न कायम विचारण्याचा माझा आग्रह आहे. स्वतःच्या प्रेमात पडून आपला प्रवास पुन्हा सांगण्यासाठी लिहीत नाही. पण एका विद्यार्थ्याच्या मृत्यूने अस्वस्थ झाल्याने लिहीत आहे. शासकीय नोकरीच्या पलीकडेही एक जग असते. आपल्या मागे आपले घर असते. प्रत्येकाचा संघर्ष तितकाच महत्त्वाचा असतो. पण तो आपल्या जवळच्या लोकांपेक्षा महत्त्वाचा खरंच नाही. निराशेच्या एका क्षणी त्यांचा विचार केला पाहिजे.'
हेही वाचा :