Severe cold wave in Maharashtra | महाराष्ट्र गारठला! राज्यात ४८ तासांत तीव्र थंडीची लाट; हवामान विभागाचा अंदाज

Severe cold wave in Maharashtra | महाराष्ट्र गारठला! राज्यात ४८ तासांत तीव्र थंडीची लाट; हवामान विभागाचा अंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या ४८ तासांत नंदुरबार, धुळे जळगाव, नाशिक जिल्ह्यातील काही भागात तीव्र थंडीची लाट (Severe cold wave in Maharashtra) राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे, अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात थंडीच्या लाटेचीही दाट शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील काही भागातही थंडीची लाटेची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, सोमवारी पुणे येथील तापमान ८.६, औरंगाबाद ५.७, जळगाव ५, नाशिक ८.७ अंशावर होते.

उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्यामुळे पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशपर्यंत सर्व राज्ये गारठली असून महाराष्ट्रही गारठण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी गोंदियाचे तापमान रविवारी ६.८ अंशावर होते. आगामी ४८ तासांत महाराष्ट्र आणखी गारठणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. संपूर्ण डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात ढगाळ वातावरणामुळे थंडी पडली नव्हती.

मात्र जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात मात्र कडाक्याच्या थंडीचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारत थंडीने गारठला असून त्या भागात दाट धुके व कडाक्याची थंडी आहे. त्या भागातून शीतलहरी महाराष्ट्रात येण्यास सुरुवात झाली आहे.

उत्तर भारताला 'रेड अलर्ट'

महाराष्ट्राचे किमान तापमान चार ते पाच अंशाने कमी झाली आहे. पश्चिमी चक्रवात उत्तर भारतात आणखी तीव्रतेने सक्रिय झाल्यामुळे पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, व मध्य प्रदेश या राज्यांना थंडीचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. त्यामुळे त्या भागात नागरिकांना सावधानतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील या वातावरणाचा परिणाम होणार असून किमान तापमानात आणखी चार ते पाच अंशाने घट होईल, असा अंदाज रविवारी हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी दिला आहे. (Severe cold wave in Maharashtra)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news