कोल्हापूर : थंडीचा कडाका वाढला | पुढारी

कोल्हापूर : थंडीचा कडाका वाढला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यात रविवारी थंडीचा कडाका वाढला. रात्री पारा 15 अंशांपर्यंत घसरल्याने थंडीने हुडहुडी भरली. येत्या दोन दिवसांत तापमान आणखी कमी होणार आहे. यामुळे सोमवारपासूनचे दोन दिवस कडाक्याच्या थंडीचे असतील, अशी शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून थंडी वाढली. आज सकाळी तापमानात दोन अंशांनी, तर रात्री आणखी दोन अंशांनी घट झाली. गेल्या 24 तासांत पारा 4 अंशांनी घटला. यामुळे हवेतील गारठा आणखी वाढला. आज दिवसभर बोचर्‍या वार्‍याने थंडीची तीव्रता अधिक जाणवत होती.

थंडी वाढल्याने पहाटे आणि रात्रीच्या वर्दळीवर परिणाम झाला. स्वेटर, कानटोप्या, हातमोजे अशी उबदार कपडे परिधान करूनच अनेकजण घराबाहेर पडले होते. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या होत्या. आज पहाटे 17.2 अंशांवर पारा होता. रात्री तो 15 अंशांपर्यंत खाली गेला. उद्या तो 13 अंशांपर्यंत खाली जाईल, अशी शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातून थंडी गायब झाली होती. मात्र, थंडी पुन्हा जाणवू लागली आहे. गेल्या दोन दिवसांत तर त्याची तीव्रता अधिक आहे.

उद्या पारा 10 अंशांपर्यंत घसरणार?

हवामान विभागाने जिल्ह्यात किमान तापमानात मोठी घट होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. 10) पारा 10 अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. मंगळवारी 10 अंश तापमानाची नोंद झाली, तर ते यावर्षीचे सर्वात कमी तापमान ठरणार आहे.

Back to top button