रांगोळी काढल्याने दुष्टशक्ती येत नसतील तर त्यांना सीमेवर पाठवून द्या : काँग्रेस | पुढारी

रांगोळी काढल्याने दुष्टशक्ती येत नसतील तर त्यांना सीमेवर पाठवून द्या : काँग्रेस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये इंडियन वुमेन्स काँग्रेसच्या चर्चासत्रात अवैज्ञानिक व श्रद्धेला खतपाणी घालणारी मांडणी दोन महिलांनी केली. कांचन गडकरी यांनी हळदी कुंकवाचे महत्व सांगितले तर भाजप नेत्या कल्पना पांडे यांनी घराबाहेर रांगोळी काढल्याने दुष्टशक्ती येत नाहीत असे सांगितले. रांगोळीने जर दुष्टशक्ती येत नसतील तर कांचन गडकरी व कल्पना पांडे यांना चीन, पाकिस्तानच्या सीमेवर पाठवून द्या व तिथे रांगोळ्या काढा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, वैज्ञानिक व तंत्रवैज्ञानिक प्रगतीमुळे माणसांच्या जीवनात खूप सकारात्मक बदल झाले आहेत. आरोग्य, सुरक्षा, कृषी, उर्जा विभागासह अनेक क्षेत्रात माणसाने मोठी प्रगती केली आहे. नागपूर विद्यापीठात सुरु असलेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी हळदी कुंकवाचे महत्व सांगणे व संयोजिका कल्पना पांडे यांनी घराबाहेर रांगोळी काढल्याने घरात दुष्टशक्ती येत नाहीत असा सल्ला देणे अयोग्य आहे, हा श्रद्धेचा भाग असू शकतो त्याचे विज्ञानामध्ये काय काम? यावर वैज्ञानिक महिलांनी आक्षेप घेतला हे योग्यच झाले आणि काँग्रेस पक्षही अशा प्रकारच्या विचारसरणीचा निषेध करत असल्याचे लोढे यांनी सांगितले.

विज्ञानाच्या आधारे महिलांचे सक्षमीकरण यासंदर्भात मांडणी करणे गरजेचे असताना अशा प्रकारे अवैज्ञानिक विचार मांडून मुळ कार्यक्रमाच्या  उद्देशाला गडकरी व पांडे या दोन महिलांनी हरताळ फासला आहे. रांगोळी काढणे, हळदी कुंकु यांचा विज्ञानाशी संबंध जोडण्याची गरजच नाही. याचा फायदा होत असेल तर आपल्याला राफेल, अत्याधुनिक शस्त्रांची गरजच काय? डीआरडीओची गरज काय? सायन्स काँग्रेसची गरज काय? असे सवाल उपस्थित करत ही विचारसरणी देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारी आहे, देशाच्या प्रगतीसाठी घातक आहे, असेही लोंढे म्हणाले.

           हेही वाचलंत का ?

Back to top button