मुंबई : दोन माजी महापौरांसह शिवसेनेचे डझनभर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर | पुढारी

मुंबई : दोन माजी महापौरांसह शिवसेनेचे डझनभर नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबई; राजेश सावंत :  माजी महापौरांसह शिवसेनेचे सुमारे डझनभर माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यात शिवसेनेच्या प्रत्येक आघाडीवर रणरागिणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच ते सहा महिला माजी नगरसेविकांचाही समावेश असून, शिवसेनेच्या दोन माजी महापौरही शिंदे गटाच्या गळाला लागल्या आहेत.
या सर्व पक्षांतर इच्छुक नगर- सेवकांशी शिंदे गटाच्या नेत्यांची प्राथमिक चर्चाही झाली आहे. निवडणुकांचा मुहूर्त कधीचा निघतो याचा अंदाज घेऊन ही शिवसेनेची कुमक शिंदे गटात दाखल होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

शिवसेनेची विस्कळलेली मोट बांधण्यासाठी स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते आदित्य ठाकरे व शिवसेनेतील ज्येष्ठ नेते दिवस-रात्र एक करीत आहेत. आतापर्यंत शिवसेनेचे जेमतेम पाच नगरसेवक शिंदे गटात गेले. दिलीप (मामा) लांडे, चार वर्षे स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले माझगावचे शिव- सेना उपनेते यशवंत जाधव, दहिसरच्या शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर व परमेश्वर कदम यांचा त्यात समावेश आहे. उर्वरित ९२ नगरसेवक अजूनही ठाकरेंसोबत आहेत. मात्र, या एकजुटीला सुरूंग लावण्याची तयारी शिंदे गटाने पूर्ण केल्याचे दिसते.

आता शिंदे गटाच्या मार्गावर असलेल्यांमध्ये दोन महिला माजी महापौर असून, शहरातील २, पश्चिम उपनगरातील दोन, व पूर्व उपनगरातील एक रणरागिणी यांचाही त्यात समावेश आहे. पश्चिम उपनगरातील शिवसेनेच्या एक ज्येष्ठ माजी नगरसेविका सुरुवातीला भाजपात जाण्यास उत्सुक होत्या. परंतु भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने त्यांना शिंदे गटात जाण्याचा सल्ला दिला. या रणरागिणींसह शिवसेनेचे अन्य ७ माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे समजते. निवडणूक घोषित होताच हे नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करतील, असे सांगण्यात येत आहे.

Back to top button