नाशिक : शिवसेना ठाकरे गट अन् वंचित आघाडीच्या नेत्यांची "चाय पे चर्चा' | पुढारी

नाशिक : शिवसेना ठाकरे गट अन् वंचित आघाडीच्या नेत्यांची "चाय पे चर्चा'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत झाल्यानंतर आता स्थानिक पातळीवरही त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिकमध्ये निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबरच युतीसंदर्भात उभय पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची चाय पे चर्चा झाल्याने अन्य पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्यात युतीसंदर्भात नुकतीच चर्चा झाली. आता स्थानिक स्तरावरही त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या चाय पे चर्चेत शिवसेना उद्धव बाळासाहेब गटातर्फे उपनेते सुनील बागूल, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर तर वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष पवन पवार, महानगरप्रमुख अविनाश शिंदे, संजय साबळे, बाळासाहेब शिंदे आदींनी सहभाग घेतला. शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्यास नाशिक महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सहज जिंकता येणे शक्य असल्याचे मत दोन्ही पक्षांतील स्थानिक नेत्यांनी म्हटले. त्यामुळे आता जागावाटप कसे होते आणि त्यांची पुढील रणनीती काय असेल याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button