पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबईतील रोड शो आणि दोन दिवसी दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी ताशेरे ओढले आहेत. उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी मुंबईत रोड शो का? असा सवाल करत राजकारणाचे धंदे बंद करा. सन्मानाने आलाय सन्मानाने निघून जा. तुमच्याविषयी जे प्रेम आहे ते राहील. इथे राजकीय उद्योग करू नका, असे राऊत यांनी म्हटले आहे.
खासदार राऊत यांनी आज (दि. ५) प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत उद्योगपतींच्या भेटीला आलेले असतील, त्यांच्या राज्याच्या विकासासाठी चर्चा करणार असतील तर आक्षेप नाही. पण आमच्याकडील उद्योग ओरबडून नेणार असतील तर आक्षेप आहे. मुंबईत गुंतवणुकीसाठी रोड शो करणार असतील तर आश्चर्यकारक आहे. आपण इथे राजकारण कारायला आलाय का? राज्याच्या विकासासाठी मुंबईची मदत घ्यायला आलाय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोस येथे होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदारांच्या परिषदेला जाणार आहेत. तिथे ते काय रोड शो करणार का? मग उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ताजमहाल हॉटेल समोर रोड शो करण्याचा संबंध काय? राजकारणाचे धंदे बंद करा. सन्मानाने आलाय सन्मानाने निघून जा. राजकीय उद्योग करू नका, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
हेही वाचा :