कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून रेशनवर मोफत धान्य | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून रेशनवर मोफत धान्य

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत दरमहा नियमित मिळणारे धान्य आता वर्षभर मोफत देण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून हे मोफत धान्य वितरण सुरू होईल. याचा लाभ जिल्ह्यातील 23 लाख 42 हजार 76 लाभार्थ्यांना होणार आहे.

रेशनवरून अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या लाभार्थ्यांना दोन रुपये किलो दराने गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. कोरोना कालावधीत या व्यतिरिक्त कोरोना कालावधीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत 28 महिने अतिरिक्त धान्य मोफत देण्यात आले. आता ही योजना बंद झाली असून जानेवारी ते डिसेंबर या एक वर्षांच्या कालावधीसाठी नियमित धान्य मोफत दिले जाणार आहे.

या योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत प्रतिमाणसी 3 किलो तांदूळ, तर 2 किलो गहू दिला जाईल. अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिकार्ड 20 किलो तांदूळ आणि 15 किलो गहू मोफत दिला जाणार आहे. याकरिता ‘डाटा सिडिंग’चे काम बुधवारी करण्यात आले. याकरिता दैनंदिन वितरण बंद ठेवण्यात आले होते. उद्यापासून प्रत्यक्ष जानेवारीचे मोफत धान्य वाटप सुरू होईल. यासह डिसेंबर महिन्यातील शिल्लक धान्याचेही वाटप होणार आहे.

रेशन दुकाने वर्षभर कॅशलेस

रेशनवरून दिले जाणारे धान्य वर्षभर मोफत दिले जाणार आहे. यामुळे पिशव्या आणि रेशनकार्डच घेऊन दुकानात जायचे आणि धान्य घेऊन यायचे, असे वर्षभर चालणार आहे. यामुळे रेशन धान्य दुकाने पूर्णपणे कॅशलेस होणार असून वर्षभर गल्ल्याचा ड्रॉवर बंदच राहणार आहे. आर्थिक उलाढालच बंद होणार असल्याने दुकाने चालवायची कशी, असा प्रश्न दुकानदारांमोर आहे.

मोफत धान्य वितरणामुळे दुकानातील आर्थिक उलाढाल पूर्ण बंद होणार आहे. दुकानात पैसेच येणार नसल्याने दैनंदिन चहा, अगरबत्तीपासून ते अगदी कामगार पगार, स्वच्छता आदी सर्वांचा खर्च कसा करायचा, असा दुकानदारांचा सवाल आहे. धान्य विक्रीतून जमा होणार्‍या रकमेमधून हा दैनंदिन तसेच दरमहा खर्च होत होता, तो आता करता येणार नाही. मोफत धान्य वाटपासाठी दुकानदारांना कमिशन दिले जाणार आहे. मात्र, ते कमिशन दर महिन्याला द्यावे, अशी मागणी दुकानदारांची आहे. यापूर्वी 28 महिने मोफत धान्य वाटप केले. त्याचे वर्षभराचे कमिशन अद्याप प्रलंबित आहे. तसाच अनुभव या उपक्रमात नको, अशी अपेक्षा दुकानदार करत आहेत.

दरमहा 12,469 टन धान्याचे वितरण

या योजनेंतर्गत जिल्ह्यात दरमहा एकूण 12,469 टन धान्याचे वितरण केले जाणार आहे. अंत्योदय योजनेसाठी 1 हजार 36.18 टन तांदूळ, 777.13 टन गहू, प्राधान्य गटासाठी 6 हजार 393.84 टन तांदूळ व 4 हजार 262.56 टन गहू दर महिन्याला वितरित केला जाणार आहे.

आधार सिडिंग 99.62 टक्के पूर्ण

जिल्ह्यातील रेशन कार्डला आधार कार्ड जोडण्याचे काम 99.62 टक्के पूर्ण झाले आहे. कोल्हापूर शहरासह कागल, करवीर आणि हातकणंगले तालुका वगळता सर्व तालुक्यांचे आधार सिडिंग शंभर टक्के झाले आहे. या चार तालुक्यांतही येत्या काही दिवसांत उर्वरित काम पूर्ण होईल.

दुकानात वर्षभर पैसेच नसतील. यामुळे किरकोळ खर्च करणेही शक्य होणार नाही. यामुळे शासनाने सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून त्याच्या विक्रीची परवानगी द्यावी.

– रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना

 

द़ृष्टिक्षेपात जिल्हा

अंत्योदय कार्ड
51,809
अंत्योदय लाभार्थी
2,14,991
प्राधान्य कार्ड
5,16,368
प्राधान्य लाभार्थी
21,31,283
एकूण कार्ड संख्या
5,68,160
एकूण लाभार्थी
23,42,076

Back to top button