दिशा सालियनच्या मृत्यूची होणार एसआयटी चौकशी; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा | पुढारी

दिशा सालियनच्या मृत्यूची होणार एसआयटी चौकशी; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालीयन हिच्या मृत्यूची चौकशी एसआयटी नेमून करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. त्यांच्या या निर्णयाने शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेमध्ये दिशा सालियनच्या मृत्यूचे प्रकरण मांडत त्यामध्ये आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ करीत आदित्य ठाकरे यांच्या एसआयटी चौकशीची मागणी केली. यामुळे सहा वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. दिशा सालियनची आत्महत्या झाली नसून तिचा खून करण्यात आला आहे. तिच्या खुनाचे पुरावेही नष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार नितेश राणे, अमित साटम, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी केली. या मागणीसाठी वारंवार वेलमध्ये येत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. अखेरीस फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली.

या चौकशीवर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. राजकीय हेतूने ही चौकशी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सीबीआयने क्लीनचिट दिली असताना पुन्हा पोलीस चौकशी लावणे कितपत योग्य आहे, असा संतप्त सवाल त्यांनी केला. तसेच दिशा सालियन आणि तिच्या आई-वडिलांनी तिने आत्महत्याच केली असून तिला बदनाम करू नये, अशी विनंती केली होती. पुन्हा पुन्हा हा विषय काढून त्यांना त्रास देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले. फडणवीस यांनी सुशांतसिंह प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिला आहे. दिशाची केस सीबीआयकडे कधीच नव्हती, असे स्पष्ट केले. कोणतेही राजकारण न आणता नवीन पुराव्याच्या व माहितीच्या आधारे अतिशय निःपक्ष चौकशी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button