मुंबई-गोवा महामार्गावर काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करा : निलेश राणे | पुढारी

मुंबई-गोवा महामार्गावर काम पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करा : निलेश राणे

राजापूर(रत्‍नागिरी), पुढारी वृत्‍तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर आंदोलन केले. काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करा. तसेच आजच्या आज निर्णय द्या, निर्णय होऊन टोलवसुली बंद केली जात नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. कार्यकर्ते टोल नाक्यावर ठिय्या मांडून बसल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महामार्गाचे काम अपूर्ण स्थितीत असून अद्यापही टोलनाक्यावर रुग्णवाहिका, क्रेन व इतर अनेक सुविधाही उपलब्ध नाहीत. टोल नाक्यापासून सहाशे मीटरवर अद्यापही महामार्गाचे काम सुरु आहे. स्थानिकांना अजून जमीन मोबदला मिळालेला नाही. मग, असे असताना फक्त हातिवले येथे टोल वसुली करण्याची घाई का? असा सवाल निलेश राणे यांनी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना यावेळी विचारला.

ठेकेदार कोणीही असो यांच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. त्यामुळे तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून घ्या व लगेच निर्णय घ्या व तात्काळ टोल वसुली थांबवावी. टोल वसुली थांबवली जात नाही तोपर्यंत जागेवरून हलणार नाही, असे निलेश राणे यावेळी म्‍हणाले.

सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ओसरगांव ते हातिवले या भागातील महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी हातीवले पासून मुंबईकडे अद्यापही काम अपूर्ण आहे. त्यामुळे येथे टोल वसुली थांबवावी. टोलला विरोध नाही पण काम अपूर्ण असताना आम्ही टोल देणार नाही. दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून स्थानिक परिस्थितीची माहिती दिली व त्वरीत टोलवसुली थांबवण्याची मागणी केली.

.हेही वाचा

नाशिक : ‘नाइट रायडर्स’ जरा जपूनच, पोलिसांनी जप्त केल्या २६ गाड्या

परभणी : आंगणवाडीत गॅस गळती; युवकाच्या धडसामुळे १५ चिमुकल्या बचावल्या

कोल्हापूर : आता जिल्हा परिषद, पंचायत समितीकडे लक्ष

Back to top button