

खंडाळा (सातारा); पुढारी वृत्तसेवा : धोमबलकवडी कालव्यात पडलेला रानगवा वाण्याचीवाडी गावच्या हद्दीत वाहत आला होता. कालव्याला सिमेंट काँक्रीटचे अस्तरीकरण असल्याने त्याला कालव्यातून बाहेर येता येत नव्हते. अखेर खांबाटकीतील नवीन बोगद्याच्या मार्गावर कॅनॉलवरील पुलाच्या बांधकामाजवळ त्याला बाहेर पडण्यात यश आले. कॅनॉलमधून बाहेर पडताच त्याने डोंगराच्या बाजुला जंगलात धूम ठोकली.
सोमवारी दूपारी चारच्या सुमारास वाण्याचीवाडी गावचे माजी सरपंच मोहन पाटणे हे धोम बलकवडी कॅनॉलवर हातपाय धुण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना कॅनॉलमधून रानगवा वाहात येत असल्याचे दिसले. वाहत्या पाण्यातून बाहेर पडण्यासाठी रानगव्याची धडपड चालू होती.
मात्र अस्तरीकरणामुळे त्याचे पाय घसरून तो पुन्हा पाण्याबरोबर वाहात होता. रानगवा खूप दमलेला होता. अखेर खांबाटकीच्या नवीन बोगदा मार्गावर कॅनॉल वर पुलाचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी त्याला बाहेर पडण्यात यश आले.
रानगवा कॅनॉलमध्ये वाहात येत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. रानगव्याला पाहण्यासाठी शेतकरी, बोगद्याच्या कामावरील मजुरांनी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने लोक गोळा झाल्याने कॅनॉलमधून बाहेर पडताच रानगव्याने डोंगराकडे धूम ठोकली. हा नर रानगवा असून धिप्पाड शरीरयष्टीचा होता.
याबाबत माहिती मिळताच खंडाळा वनपरिक्षेत्राच्या अधिकारी प्रियांका पाटील यांनी वनरक्षकांना घटनास्थळी पाठवले. हा रानगवा पाणी पिताना कालव्यात पडला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. भोर तालुक्यात किंवा खंडाळ्याच्या पश्चिम भागातून हा रानगवा वाहत आला असावा. नागरिकांनी त्याला हुसकावण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.