Punjab Kings vs Rajasthan Royals : पंजाबसमोर राजस्थानचे ‘रॉयल’ आव्हान | पुढारी

Punjab Kings vs Rajasthan Royals : पंजाबसमोर राजस्थानचे ‘रॉयल’ आव्हान

दुबई; वृत्तसंस्था : राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज संघ इंडियन प्रीमियर लीग (PBKvsRR) स्पर्धेतील सामन्यात जेव्हा मंगळवारी एकमेकांसमोर असतील, तेव्हा दोन्ही संघातील शीर्ष फलंदाजी फळीकडे सर्वांचे लक्ष असेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांना म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही.

त्यामुळे दोन्ही संघ चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असतील. पंजाब किंग्ज संघाबाबत बोलायचे झाल्यास हा संघ गेल्या 14 सत्रांत स्थिर दिसला नाही. कारण संघाचे कर्णधार आणि प्रशिक्षक अनेकदा बदलले आहेत. तालिकेत दोघांचे समान सहा गुण असले तरी नेट रनरेटमुळे राजस्थान पाचव्या तर पंजाब सहाव्या स्थानावर आहेत. (PBKvsRR)

आयपीएलमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या के. एल. राहुलला फलंदाजीसोबतच अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली कर्णधारपदाची जबाबदारी देखील चोख पार पाडावी लागेल. या सामन्यात आघाडीच्या फलंदाजी फळीवर संघाची जबाबदारी असेल. रॉयल्स संघाच्या लिविंगस्टोनने टी-20 क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली आहे. नुकतेच त्याने ‘द हंड्रेड’मध्ये चांगली कामगिरी केली आहे. जो वेस्ट इंडिजच्या लुईससोबत डावाची सुरुवात करू शकतो. गोलंदाजीत मोहम्मद शमीसोबत क्रिस जोर्डन किंवा नॅथन एलिस पंजाबचे नेतृत्व करतील.

राजस्थानकडून संजू सॅमसनला तिसर्‍या स्थानी सातत्य ठेवावे लागेल. राजस्थानसाठी चांगली गोष्ट म्हणजे पंजाबची कमकुवत गोलंदाजी आहे ज्यामध्ये शमी सोडून अनुभवी गोलंदाज नाहीत. आदिल रशीद किंवा रवी बिश्नोईवर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असेल. रॉयल्स संघ तिसरा आणि चौथा विदेशी खेळाडू म्हणून क्रिस मॉरिस, डेविड मिलर व जगातील आघाडीचा टी 20 स्पिनर तबरेज शम्सी यामधून निवड करेल.

राहुल तेवतिया, रियान पराग, जयदेव उनाडकट आणि चेतन सकारिया सारख्या खेळाडूंवर संघाला प्ले ऑफ पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी असेल. कारण जोस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यावेळी खेळणार नाहीत. दुसरीकडे पंजाबसाठी राहुल आणि मयांक अग्रवाल डावाची सुरुवात करतील. यासोबतच गेल, निकोलस पूरन आणि एम शाहरूख खान यांच्यावर चांगल्या कामगिरीची जबाबदारी असेल.

विराट सोडणार आरसीबीचे कर्णधारपद

दुबई : आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली याने सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेनंतर संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

नुकतेच कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचीही घोषणा केली होती. यंदाची आयपीएल स्पर्धा ही माझी संघाचा कर्णधार म्हणून माझी शेवटची स्पर्धा आहे. पण त्यानंतरही मी आरसीबीचा खेळाडू म्हणून मी खेळत राहणार आहे.

माझ्या शेवटच्या आयपीएल सामन्यापर्यंत मी आरसीबीसाठी खेळत राहीन. आजवर माझ्यावर ठेवलेल्या विश्वास आणि मला दिलेल्या पाठिंब्याबाबत मी सर्व चाहत्यांचे आभार व्यक्त करतो, असे कोहलीने म्हटलं आहे. कोहलीचा एक व्हिडीओ आरबीसीच्या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आला आहे.

Back to top button