मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील महामोर्चापेक्षा शुक्रवारी आमची कोकणात रत्नागिरीमध्ये झालेली सभा मोठी होती, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला लगावला. आम्ही काम करणारे आहोत. त्यामुळे राज्यात जे काम करतात, त्यांचीच चर्चा होते. जे बिनकामाचे आहेत ते मोर्चे काढतात, असा चिमटा काढून 'काम करणार्यांची होते चर्चा, बिनकामाचे काढतात मोर्चा', अशी आठवले शैलीतील चारोळीच मुख्यमंत्री शिंदे यांनी ऐकवली.
मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही जे काम करतोय ते पाहून विरोधकांच्या पायाखालीच वाळू सरकली आहे. आमच्या गटात शिवसैनिक मोठ्या संख्येने प्रवेश करत आहेत. शुक्रवारी नाशकातील सेनेचे नगरसेवक बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले. शनिवारी तेथील शिवसैनिकांनी प्रवेश केला. आमच्यावर विश्वास दाखवला त्यामुळेच कदाचित मुंबईतील महामोर्चात शिवसेनेच्या भगव्यापेक्षा इतर झेंडे अधिक दिसले.
आघाडीच्या नेत्यांना केवळ राजकारण करायचे आहे. आम्हाला राज्याचा विकास करायचा आहे. आम्ही तोतये नाहीत तर खरे तोतये कोण हे राज्याला माहीत आहे, असा थेट हल्ला मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर चढवला.
ते म्हणाले, लफंगे कोण आहेत? लफंगेगिरी कोणी केली, खुर्ची मिळवण्यासाठी बाळासाहेबांचे विचार सोडून कुणी दिले, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्या काळात अडीच वर्षे राज्य ठप्प झाले होते. आता बाहेर पडू लागले आहेत, असा टोलाही शिंदे यांनी उद्धव यांना लगावला.