Kokan Mahotsav : कोकणातील तरुणांना कोकणात रोजगार मिळावा म्हणून प्रयत्नशील राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

Kokan Mahotsav : कोकणातील तरुणांना कोकणात रोजगार मिळावा म्हणून प्रयत्नशील राहू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाइन डेस्क : कोकणचं वैभव जपण्याचा सर्वांचा प्रयत्न आहे. हे सरकार कोकणच्या समस्या आणि विकासाबाबत संवेदनशील आहे. कोकणच्या विकासासाठी नेहमी आपण प्रयत्नशील राहू, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Kokan Mahotsav ) यांनी व्यक्त केला आहे.

मुंबईच्या गोरेगाव येथील नेसको मैदानात ‘स्वराज्य भूमी कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.  या महोत्सवा’चे उद्घाटन आज मंगळवारी सकाळी 9 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. भाजप आमदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आणि कोकणभूमी प्रतिष्ठान, मी मुंबईकर अभियान या संस्थांच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून ‘या’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार 6 डिसेंबर ते शुक्रवार 9 डिसेंबर 2022 या कालावधीत हा महोत्सव होत आहे.

Kokan Mahotsav : कोकणचा माणूस आरपारची लढाई जिंकणारा

आजच्या कोकण महोत्सवात उपस्थिंतांना संबोधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “कोकण महोत्सवाला शुभेच्छा. कोकण भूमी निसर्ग समृद्ध आहे. गेल्या आठ वर्षांपासून हा महोत्सव साजरा होत आहे. मी अनेक कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून कोकणला, कोकणच्या विकासाला चालना मिळते. कोकणचं स्वत:चं एक वैशिष्ट्य आहे. निसर्ग, किल्ले, समुद्रकिनारे असं बरच मोठ वैभव कोकणला लाभलेलं आहे. कोकणचा माणूस गोड फणसासारखा आंब्यासारखा आहे. सर्वांवर प्रेम करणारा आहे. पण एकदा मनाशी काय ठरवलं, निश्चय केला तर आरपारची लढाई जिंकणारा आहे”

येवा कोकण आपलाच असा

ते पुढे बोलताना असेही म्हणाले,” येवा कोकण आपलाच असा अशी प्रेमळ हाक कोकणातील माणूस देत असतो. इथले बीच सुंदर आणि नीटनेटके आहेत खरतर तिथे पर्यटनाला संधी आहे. कोकणचं वैभव जपण्याचा प्रयत्न सर्वांचा आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना कोकणच्या बाबतीत अनेक चांगले निर्णय घेतले. पण दुर्दैव असं की काही काळ हे काम रखडलं, असं म्हणतं त्यांनी महाविकास आघाडीला टोमणा मारला.

ते असेही म्हणाले की, कोकणच्या समस्या आणि विकासाबाबत संवेदनशील आहे. कोकण विकासापासून वंचित राहणार नाही. कोकणातील तरुणांना कोकणात रोजगार मिळावा म्हणून प्रयत्नशील राहू, विकासाला चालना देण्यासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी, उद्योग येण्यासाठी प्रयत्नशील राहू. पण लोकांनी आपल्या हिताचं काय आहे याकडे लक्ष द्यावे. काही लोक भावनेला हात घालून काम करत आहेत. त्यांना बळी न जाता निर्णय घ्यावा, असे ते म्हणाल. यावेळी त्यांनी कोकणचा विकास, समस्या, प्रश्नांच्या बाबतीत  मत व्यक्त करून भविष्यातील योजनांबाबत भाष्य केले.

हे ही वाचा :

Back to top button