Stock Market Today : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीची सलग सातव्या सत्रात तेजी कायम राहिली. बुधवारी (दि.३०) आजच्या व्यवहारात सेन्सेक्सने ६३,२०० चा टप्पा पार केला. तर निफ्टीने १८,७०० अंकांवर गवसणी घातली. दोन्ही निर्देशांकाचा हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) डेटाची प्रतीक्षा आणि अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या व्याजदरवाढीच्या घोषणेआधी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकांनी आज बुधवारी स्थिर सुरुवात केली. त्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजी वाढत गेली. सेन्सेक्स ४१७ अंकांनी वाढून ६३,०९९ वर तर निफ्टी १४० अंकांनी वाढून १८,७५८ वर बंद झाला. एम अँड एम, हिंदाल्को, बजाज ऑटो, ग्रासिम, अल्ट्राटेक सिमेंट यांचे शेअर्स आघाडीवर राहिले.
झोमॅटो, आयआरएफसी, एक्सेल, येस बँक, हुडको, साउथ इंडिया बँक, पीएनबी, सुझलॉन, टाटा स्टील आणि आरव्हीएनएल हे NSE वरील सर्वात सक्रिय शेअर्स होते. ब्रिटानिया, सीसीएल, हुडको, आयसीआयसीआय बँक, आयआरएफसी, जेके लक्ष्मी सिमेंट, लेमन ट्री आणि युनियन बँक या बीएसई ५०० मधील शेअर्सनी आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेडचा शेअर्स ४.८२ टक्क्यांनी वाढून ९७.८० रुपयांवर पोहोचला. एमएसटीसी लिमिटेडचा शेअर ६.११ टक्क्यांनी वाढून ३५०.७५ रुपयांवर पोहोचला. कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडचा शेअर ७.७४ टक्क्यांनी वाढून १०६.५५ रुपयांवर पोहोचला. फिनोलेक्स केबल्स लिमिटेडचा शेअर ४.०६ टक्क्यांनी घसरून ५५५.९० रुपयांवर पोहोचला.
जुलै-सप्टेंबर तिमाहीचा (Q2) जीडीपी डेटा बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर केला जात आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था आणि श्रमिक बाजाराच्या दृष्टीकोनाबद्दल पॉवेल यांच्या भाषणाआधी अमेरिकेतील बहुतांश निर्देशांकांत घसरण झाली.
चीनमधील झीरो कोव्हिड धोरणाविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाचा आशियाई बाजारावर परिणाम दिसून येत आहे. जपानचा निक्केई ०.६१ टक्क्यांनी घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.५१ टक्क्यांनी वधारला. चीनचा शांघाय कंपोझिट ०.२५ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.२४ टक्क्यांनी वधारल्याने आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते. (Stock Market Today)
NSE आकडेवारीनुसार. परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी मंगळवारी १,२४२ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ७४४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. (Stock Market Today)
हे ही वाचा :