Share Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची सलग सातव्या दिवशी तेजी कायम | पुढारी

Share Market Today | सेन्सेक्स, निफ्टीची सलग सातव्या दिवशी तेजी कायम

Share Market Today : देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) डेटाची प्रतीक्षा आणि अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांच्या व्याजदरवाढीच्या घोषणेआधी गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकांनी आज बुधवारी स्थिर सुरुवात केली. सलग सातव्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत राहिला आहे. आज बुधवारी सेन्सेक्स १०० हून अधिक अंकांनी वधारून ६२,७०० या उच्चांकावर आहे. तर निफ्टी १८,६०० वर आहे.

या शेअर्सनी गाठला उच्चांक

झोमॅटो, आयआरएफसी, एक्सेल, येस बँक, हुडको, साउथ इंडिया बँक, पीएनबी, सुझलॉन, टाटा स्टील आणि आरव्हीएनएल हे NSE वरील सर्वात सक्रिय शेअर्स होते. ब्रिटानिया, सीसीएल, हुडको, आयसीआयसीआय बँक, आयआरएफसी, जेके लक्ष्मी सिमेंट, लेमन ट्री आणि युनियन बँक या बीएसई ५०० मधील शेअर्सनी आज ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेडचा शेअर्स ४.८२ टक्क्यांनी वाढून ९७.८० रुपयांवर पोहोचला. एमएसटीसी लिमिटेडचा शेअर ६.११ टक्क्यांनी वाढून ३५०.७५ रुपयांवर पोहोचला. कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडचा शेअर ७.७४ टक्क्यांनी वाढून १०६.५५ रुपयांवर पोहोचला.

जुलै-सप्टेंबर तिमाहीचा (Q2) जीडीपी डेटा बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजता जाहीर केला जाणार आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था आणि श्रमिक बाजाराच्या दृष्टीकोनाबद्दल पॉवेल यांच्या भाषणाआधी अमेरिकेतील बहुतांश निर्देशांकांत घसरण झाली आहे.

आशियाई बाजारात संमिश्र वातावरण

चीनमधील झीरो कोव्हिड धोरणाविरुद्ध सुरु असलेल्या आंदोलनाचा आशियाई बाजारावर परिणाम दिसून येत आहे. जपानचा निक्केई ०.६१ टक्क्यांनी घसरला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.५१ टक्क्यांनी वधारला. चीनचा शांघाय कंपोझिट ०.२५ टक्क्यांनी आणि हाँगकाँगचा हँगसेंग निर्देशांक ०.२४ टक्क्यांनी वधारल्याने आशियाई बाजारात संमिश्र वातावरण होते. (Share Market Today)

हे ही वाचा :

Back to top button