प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत ७५ हजार पद भरतीचा आढावा घेणार : देवेंद्र फडणवीस | पुढारी

प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत ७५ हजार पद भरतीचा आढावा घेणार : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत ७५ हजार पद भरतीचा आढावा घेणार असून या प्रक्रियेला गती देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, पोलिस भरतीच्या अर्ज प्रक्रियेसाठी १५ दिवसांची वाढ करण्यात आली असल्याचेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, ७५ हजार पदभरतीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. त्याला गती देण्याचे काम केले आहे. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीपुढे ७५ हजार पदे भरण्याबाबत कोणत्या विभागाने काय कार्यवाही केली, याचा आढावा मंत्रिमंडळाला द्यावा लागणार आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्याकडून ३ डिसेंबरला याबाबतची घोषणा करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

त्याचबरोबर मंत्रिमंडळात झालेल्या अन्य निर्णयांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गायरान जमिनीवरील घरे नियमित करण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेत दस्त नोंदणी केवळ १ हजार रूपयांत होणार असून भाडेपट्ट्याच्या दस्तांना १ हजार रूपये कमी शुल्क करण्यात येणार आहे. सरसकट वीज तोडणी न कऱण्याचे आदेश देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मोदींवर बोलणाऱ्याचे डिपॉझिट नेहमीच जप्त झाले आहे. द काश्मिर फाईल्स सिनेमात सत्य दाखविण्यात आले आहे, असे ते म्हणाले.

२९ नोव्हेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)

• स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार (सामान्य प्रशासन विभाग)

* दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार. ३ डिसेंबरपासून विभाग कार्यरत ( सामाजिक न्याय विभाग)

* अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देणार.
अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करणार  ( सामान्य प्रशासन विभाग)

• सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर. राज्य शासनाची ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता. (गृह विभाग)

• प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना १ हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्याना होणार फायदा. (महसूल विभाग)

• गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार. राज्यातील २३८६ गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी २०० चौ.मी. जागा मोफत देणार. (महसूल विभाग )

• अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या ८२६ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. ४३१७ हेक्टर क्षेत्राला मिळणार लाभ (जलसंपदा विभाग)

• नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या १६९.१४ कोटी खर्चास सुधारित मान्यता. ३६५९ हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ (जलसंपदा विभाग)

* शासकीय कर्मचाऱ्यांना २००६ ते २००८ या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीचा आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणार (सामान्य प्रशासन विभाग)

• महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती. (वन विभाग)

* बीड जिल्ह्यातील आश्रमशाळेस अनुदानित तत्वावर मान्यता (इतर मागास बहुजन कल्याण)

पोलिस भरतीसाठी मुदतवाढ 

राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त. अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी निर्णय; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली.

हेही वाचा :

Back to top button