Sanjay Raut: शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्र तोडण्याचा कट; राऊतांचा आरोप | पुढारी

Sanjay Raut: शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्र तोडण्याचा कट; राऊतांचा आरोप

पुढारी ऑनलाईन: सध्याचे शिंदे फडणवीस सरकार हे मिंधे सरकार आहे. केंद्र सरकार या सरकारचा हातातील कठपुतळी सारखा वापर करत आहेत. यामुळेच कर्नाटक सरकार आता जतवर देखील आपला दावा करत आहे. त्यामुळे राज्यातील हे सरकार जर आपण घालवले नाही तर केंद्र आणि शिंदे सरकारकडून महाराष्ट्राचे ५ तुकडे होतील, असे म्हणत या सरकारचा महाराष्ट्र तोडण्याचा कट सुरू असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला आहे.

पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रात सध्या हतबल सरकार कार्यरत आहे. या सरकारला अजून महाराष्ट्र समजलेलाच नाही. महाराष्ट्राच्या नेतृत्वात सध्या मिंधे झालेले सरकार काम करत आहे. याच भावनेतून सध्याचे सरकार हे महाराष्ट्रातील मुंबई, सीमाभाग, विदर्भ हा भाग तोडण्याचा कट रचत आहे. राजकीय दरोडेखोरांची महाराष्ट्रावर वक्रदृष्टी असल्याने ते महाराष्ट्राचे लचके तोडू शकतात. त्यामुळे हे सरकार हटवले नाही तर, हे सरकार महाराष्ट्राचे तुकडे करेल, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

आदित्य ठाकरे यांचा दौरा हा राष्ट्रीय

आदित्य ठाकरे हे सध्या बिहार दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची देखील भेट घेणार आहोत. या भेटीवर नेत्यांकडून अनेक राजकीय फैरी उडत आहेत. यावर बोलताना राऊत म्हणाले, विरोधकांनी आदित्यचा दौरा हा राजकीय न मानता तो एक राष्ट्रीय दौरा असल्याचे मानावे. सध्या भारतीय राजकारणात तरुणांची पिढी उभारी घेत आहे. ही पिढी महाराष्ट्रात परिवर्तनाचे काम करत आहे. राजकारणात येऊ घातलेली पिढी देशाला आणखी मजबूत करेल असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.

काहीही झाले तरीही पुन्हा सुरक्षा मागणार नाही

सरकारकडून, खासदार संजय राऊत यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, आमच्या जीवाला काहीही बरे वाईट झाले तर त्याला हे सरकार जबाबदार राहील. काहीही झाले तरीही सरकारकडे पुन्हा सुरक्षा मागणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दोन महिन्यात या सरकारचे काय होईल सांगता येत नाही, हे दानवेंनी केलेले वक्तव्य संभ्रम निर्माण करणारे आहे. आमच्या पडद्यामागच्या हालचाली त्यांनाही लवकरच समजतील आणि हे सरकार लवकर कोसळेल असे म्हणत, त्यांनी मध्यावतीचे संकेत दिले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button