शिवडी क्षयरोग रुग्णालय रिहॅबीलिटेशन सेंटर होणार, राज्यभरातील टीबी रुग्णांना फायदा | पुढारी

शिवडी क्षयरोग रुग्णालय रिहॅबीलिटेशन सेंटर होणार, राज्यभरातील टीबी रुग्णांना फायदा

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : क्षयरोगामुळे फुफ्फुस खराब झालेल्या तसेच पोस्ट टीबीच्या समस्या असलेल्या रुग्णांसाठी आता रिहॅबीलिटेशन सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिवडी क्षयरोग रुग्णालय येथे हे सेंटर सुरू होणार असल्याने रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकाना दिलासा मिळणार आहे. (Shivdi Tuberculosis Hospital will be a rehabilitation center)

पालिकेचे शिवडी क्षयरोग रुग्णालय क्षयरोग बाधितांवर उपचार केले जातात. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर साधारणता ७५ ते ८० टक्के आहे. क्षयरोगाच्या विषाणूंचा सर्वाधिक परिणाम हा रुग्णाच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे क्षयरोगाने ग्रस्त रुग्णांचे फुफ्फुस खराब होते. शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४० टक्के रुग्णांचे फुफ्फुस खराब होत असल्याचे समोर आले आहे.

पोस्ट टीबी

तसेच ‘पोस्ट टीबी’ आशा प्रकारच्या समस्या जाणवत असल्याच्या देखील तक्रारी येत आहेत. यासोबत अशा रुग्णांमुळे इतर व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका असल्याने अशा रुग्णांसाठी ‘रिहॅबीलिटेशन सेंटर’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच काम सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.नम्रता कौर यांनी दिली.

‘रिहॅबीलिटेशन सेंटर’ मध्ये पोस्ट टीबी रुग्णांना तपासले जाणार असून यात तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असणार आहे.

त्याशिवाय रुग्णांची फिजिओथेरपी तसेच समुपदेशन देखील करण्यात येणार आहे. यासाठी ३० लाख रुपयांची मशिनरी विकत घेतली जाणार आहे.

‘रिहॅबीलिटेशन सेंटर’चा फायदा कोविड रुग्णांना देखील

याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्याला प्रशासकीय मंजुरी देखील मिळाली आहे. त्यामुळे या केंद्राचे लवकरच काम सुरू होणार आहे. पोस्ट टीबी प्रमाणेच पोस्ट कोविड समस्या देखील येत असल्याने या ‘रिहॅबीलिटेशन सेंटर’चा फायदा कोविड रुग्णांना देखील होणार असल्याचे डॉ.कौर म्हणाल्या.

शिवडीच्या टीबी रुग्णालयात दररोज क्षयरोग बाधित सरासरी ४० रुग्ण दाखल होतात.

टीबी रुग्णालयात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांमध्ये ७२ टक्के पुरुष तर २७ टक्के महिला रुग्ण आहेत. मुंबईतील ५१ टक्के, इतर जिल्ह्यातील १३.८८ टक्के तर राज्याबाहेरील ४३.७२ टक्के रुग्ण दाखल आहेत. मुंबई बाहेरील ४८.०६ टक्के रुग्ण टीबी रुग्णालयात उपचार घेतात.

क्षयरोग बाधित रुग्णांमध्ये १६ ते ४० वयोगटातील ८६.०९ टक्के रुग्णांचा समावेश आहे.

Back to top button