मला धक्का देऊन ढकलले : महिलेचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप | पुढारी

मला धक्का देऊन ढकलले : महिलेचा जितेंद्र आव्हाडांवर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंब्रा पोलीस ठाण्यासमोर महिला कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला होता. तर दुसरीकडे विनयभंगाची तक्रार करणाऱ्या महिलेने आज (दि. १४) दुपारी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडत आव्हाड यांच्यावर आरोप केला आहे.

त्या म्हणाल्या की, मी अनेक कार्यक्रमांना जात असते. कळवा पूलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. जेव्हा मुख्यमंत्री शिंदे निघाल्यानंतर मी त्यांना भेटण्यासाठी गेले. मी भेटायला पुढे जात होते. त्यावेळी आमदार आव्हाड यांना माझा अडथळा आल्याने त्यांना जायला वाट मिळत नव्हती. त्यांनी मला जाणूनबुजून हाताला धरून बाजूला ढकलले. आज हे माझ्याबरोबर झाले आहे. हे कुणाबरोबरही होऊ शकते, असे त्या म्हणाल्या.

आमदारांचे हे वागणं खूप चुकीचे होते. माझ्या परवानगीशिवाय त्यांनी मला हात लावला आहे. त्यांची मी खूप निंदा करते. याबाबत मी पोलीस आणि गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की, जे माझ्याबरोबर झाले आहे, त्याबद्दल मला न्याय मिळाला पाहिजे. धक्का लागतो. पकडून धक्का दिला जातो, अशीही प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपल्यावर हा दुसरा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सांगत आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. आव्हाड यांच्या या ट्विटचे पडसाद त्यांचा मतदार संघ असलेल्या मुंब्र्यात लगेच उमटले. संतापलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंब्रा बायपासवर सकाळीच जाळपोळ केली आहे. सकाळीच हा प्रकार झाल्याने बायपासवर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, आता बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

 

हेही वाचंलत का ?

Back to top button