एसआयपी चुकल्यास बँक किंवा म्युच्युअल फंड कंपन्या दंड ठोठावतात का? | पुढारी

एसआयपी चुकल्यास बँक किंवा म्युच्युअल फंड कंपन्या दंड ठोठावतात का?

कोरोना काळानंतर शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. देशात आजघडीला डी-मॅट खात्यांची संख्या सुमारे 11 कोटींवर पोचली आहे. कोरोना काळापूर्वी ही संख्या दोन ते चार कोटींच्या आसपास होती.

गुंतवणूकदारांची संख्या वाढत असताना बहुतांश मंडळी एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत. या माध्यमातून गुंतवणूक करणे सुलभ आणि दमदार परतावा देणारे आहे. मात्र एखाद्या कारणाने सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच एसआयपीचा मासिक हप्ता चुकला तर बँक किंवा म्युच्युअल फंड कंपन्या दंड ठोठावतात का?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एसआयपी मासिक असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. कोणत्या तारखेला खात्यातून रक्कम जाते याबाबत सजग राहावे, जेेणेकरून त्यादिवशी खात्यात पुरेशी रक्कम असेल. मात्र काही कारणाने बॅलन्स कमी झाल्यास आणि एसआयपीचा हप्ता जादा असेल, तर त्या महिन्यात एसआयपीची रक्कम कापली जाणार नाही. अशा वेळी फंड हाऊसकडून कोणत्याही प्रकारची पेनल्टी आकारली जात नाही. मात्र बँकेकडून दंड आकारला जातो. ही रक्कम अडीचशे ते पाचशे रुपयांपर्यंत असू शकते.

गुंतवणुकीसाठी शिस्त बाळगा

एसआयपीचा हप्ता चुकणार नाही, याबाबत सजग राहणे महत्त्वाचे आहे. याचा थेट परिणाम परताव्यावर होतो म्हणूनच मंथली एसआयपीसाठी निश्चित केलेल्या तारखेला खात्यात रक्कम ठेवण्याबाबत दक्ष राहावे. एसआयपी बंद झालीच तर गुंतवणूकदार ती एसआयपी पुन्हा करू शकत नाही म्हणून एसआयपीबाबत शिस्त बाळगायला हवी.

क्षमता पाहूनच एसआयपीची रक्कम ठरवावी

ब्रोकर मंडळी कमिशनपोटी गुंतवणूकदारांना पाच, दहा, वीस हजारांच्या मासिक एसआयपी सुरू करण्याचा सल्ला देतात. शेअर बाजारातील दमदार परतावा आपल्यालाही मिळावा या उद्देशाने मोठ्या रकमेची एसआयपी सुरू करतो. सुरवातीचे काही दिवस एसआयपी मॅनेज होते; पण कालांतराने जादा रक्कम असल्यास वाढत्या खर्चामुळे खात्यात शिल्लक ठेवण्यास अडचण येऊ लागते. परिणामी एसआयपी मिस होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून आर्थिक ओढाताण होणार नाही आणि बाजारातील तेजीचा फायदाही पदरात पडावा, अशा रितीने एसआयपीची रक्कम ठेवावी. जसजसे उत्पन्न वाढेल, तसतसे एसआयपीच्या रकमेत वाढ करावी.

एसआयपी सतत चुकत असेल तर…

एसआयपी अनेकदा चुकत असेल, तर पेनल्टीची रक्कम वाढत जाते. त्याचा थेट परिणाम हा म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवर होतो. आपला परतावा कमी होतो. सलग तीन महिने आपल्या खात्यातून एसआयपी जमा झाली नाही, तर म्युच्युअल फंड कंपनीकडून एसआयपी बंद केली जाते. अर्थात फंडामध्ये असलेली रक्कम ही सुरक्षित राहते; परंतु पुढे एसआयपीतून गुंतवणूक सुरू राहत नाही. आपण एसआयपीचे पेमेंट भरण्यास सक्षम नसाल, तर म्युच्युअल फंड कंपनीला सूचना देऊन एसआयपी बंद करण्याची विनंती करावी. याशिवाय संबंधित फंडाच्या अ‍ॅपमध्येदेखील एसआयपी बंद करण्याची सुविधा असते. त्याचाही उपयोग करू शकता.

Back to top button