Share Market | कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला | पुढारी

Share Market | कमकुवत जागतिक संकेतांमुळे सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला

पुढारी ऑनलाईन डेस्क : कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज गुरुवारी (दि.१०) शेअर बाजारात (Share Market) घसरण दिसून आली. बाजार खुला होताच सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ३२६ अंकांनी घसरून ६०,७०० वर होता. तर निफ्टी १०९ अंकांनी खाली येऊन १८ हजारांवर आला. त्यानंतर सेन्सेक्स ५०० अंकांनी घसरला. तर निफ्टीही १८ हजारांच्या खाली येताना दिसत आहे. जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत आणि अमेरिकेतील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतासह आशियाई बाजारात घसरण दिसून येत आहे.

टाटा मोटर्स, ॲक्सिस बँक, टेक महिंद्रा, आयशर मोटर्स आणि अल्ट्राटेक सिमेंट हे आज NSE वर टॉप गेनर्स होते. याउलट सिप्ला, डॉ. रेड्डीज, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक आणि भारती एअरटेल यांचे शेअर्स टॉप लुजर्स ठरले.

आशियाई शेअर बाजारात घसरण झाली आहे. जपानचा निक्केई निर्देशांक १.१७ टक्क्यांनी तर दक्षिण कोरियाचा KOSPI ०.५५ टक्क्यांनी घसरला आहे. शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.१६ टक्क्यांनी घसरला असून आणि हँग सेंग निर्देशांक १.७६ टक्क्यांनी खाली आला होता. अमेरिकेतील तीन प्रमुख स्टॉक इंडेक्स झपाट्याने घसरले आहेत. याचे पडसाद आशियाई शेअर बाजारात दिसून येत आहेत.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आकडेवारीनुसार, विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ३८७ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १,०६० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

बुधवारी BSE सेन्सेक्स १५२ अंकांनी म्हणजेच ०.२५ टक्क्यांनी घसरून ६१,०३४ वर बंद झाला होता. तर NSE निफ्टी ४६ अंकांनी खाली येऊन १८,१५७ वर बंद झाला होता.

हे ही वाचा :

Back to top button