अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच रहिवाशांचा बळी : आमदार संजय केळकर | पुढारी

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच रहिवाशांचा बळी : आमदार संजय केळकर

ठाणे; पुढारी वृत्‍तसेवा : नोटीस पाठवली होती, रहिवाशांनी दुर्लक्ष केले, असे खुलासे करून ठाणे महापालिका राबोडीमधील इमारत दुर्घटने प्रकरणी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे. किंबहुना रहिवाशांच्या जखमेवर फुंकर घालण्या ऐवजी मीठ चोळत आहेत’, अशा शब्दांत प्रशासनाचे कान पिळत ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच दोन रहिवाशांचा बळी गेल्याचा आरोप केला. आमदार संजय केळकर यांनी घटनास्‍थळी भेट देत मृतांच्या कुटुंबियांचे सात्‍वन केले आहे.

राबोडी क्र.१ मधील खत्री इमारतीचा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब थेट पहिल्या मजल्यापर्यंत कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनत दोन रहिवाशांचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार संजय केळकर यांनी घटनास्थळी धाव घेत रहिवाशांशी संवाद साधला.

यावेळी त्‍यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने कार्यवाही करून रहिवाशांना दिलासा देण्याच्या सूचना केल्या.

या घटनेबाबत बोलताना आ. केळकर म्हणाले की, खत्री इमारत दुर्घटने प्रकरणी महापालिकेची जबाबदारी केवळ नोटीस बजावण्यापुरती नाही. धोकादायक इमारतींतील रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी वेळीच कार्यवाही करण्याची गरज आहे.

अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे दोन रहिवाशांचा बळी गेला आहे. वेळीच इमारत दुरुस्त करण्यासाठी रहिवाशांना इमारत खाली करण्यास सांगितले असते तर घटना टाळता आली असती, असेही आ. केळकर यांनी स्पष्ट केले.

रहिवाशांचे पुनर्वसन त्वरित होण्यासाठी त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना प्राधान्याने त्वरित व्यवस्था करण्यास सांगितले.

अनेक धोकादायक इमारतींचा प्रश्न अजूनही मार्गी लागला नसून पुनर्वसन आणि पुनर्बांधणीबाबत शासन ठोस निर्णय घेत नाही, असा आरोपही आमदार संजय केळकर यांनी केला.

पहा व्हिडिओ : कलाकारांच्या घरचा गणपती : चला जाऊया स्वप्निल जोशीच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला

Back to top button