पुणे : अजित पवारांची कोणालाच गॅरंटी नाही : डॉ. नीलम गोर्‍हे | पुढारी

पुणे : अजित पवारांची कोणालाच गॅरंटी नाही : डॉ. नीलम गोर्‍हे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गिरीश बापट पुण्याचे पालकमंत्री असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमाने बोलावून निधी द्यायचे, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे; पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. राज्यात महाविकास आघाडी एकत्र आली. तीन पक्ष एकत्र आल्यानंतर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप झाला. माजी अर्थमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जाहीरपणे नाराजी व्यक्त झाली. त्यांच्याबद्दल कुणालाही गॅरंटी नाही, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, नीलम गोर्‍हेंच्या या विधानानंतर राष्ट्रवादीचे नेते नाराज झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विरोधी पक्षातील आमदारांना निधी दिला जात नसल्याच्या तक्रारीबाबत बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

गोर्‍हे म्हणाल्या, अंधेरी पोटनिडणुकीत ऋतुजा लटके यांना मिळालेला भरघोस पाठिंबा ही उद्धव ठाकरे यांच्यावरील मुंबईकरांच्या असलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची पावती आहे. ‘नोटा’ला झालेले मतदान म्हणजे शिवसेनेच्या विजयाला कलंकित करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी कोणी प्रयत्न केले ते सर्वांना माहीत आहे, असे त्या म्हणाला.

वास्तविक अशा प्रकारची निवडणूक संवेदनशील पद्धतीने लढवली जाते. अशावेळी जातीच्या प्रमाणपत्राचा निकाल ज्यांच्या विरुद्ध गेला, अशा नेत्यांना पुढे करून भाजपने रडीचा डाव खेळला, हे अगदी स्पष्ट आहे. विद्यमान सरकारच्या कामकाजाबाबत जनतेच्या मनात असलेली नकारात्मकता मतपेटीतून व्यक्त झाली, असेही त्या म्हणाल्या.

Back to top button