Share Market Today | शेअर बाजारात नकारात्मक सुरुवात | पुढारी

Share Market Today | शेअर बाजारात नकारात्मक सुरुवात

Share Market Today : सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग चार सत्रांत वाढ नोंदवल्यानंतर बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारांमध्ये घसरण दिसून आली. जागतिक बाजारात संमिश्र संकेत दिसत आहेत. याचे पडसाद भारतीय शेअर बाजारात दिसून येत आहे. बुधवारी सेन्सेक्स ७७ अंकांनी तर निफ्टी ३० अंकांनी खाली येऊन खुला झाला आहे. सेन्सेक्स ६१ हजारांवर तर निफ्टी १८,१०० वर होता. त्यानंतर दोन्ही निर्देशाकांची घसरण वाढत गेली. दरम्यान, सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ६ पैशांनी घसरून ८२.६५ वर आला होता.

हे शेअर्स ठरले टॉप लुजर्स

NSE प्लॅटफॉर्मवर आज भारती एअरटेल, टायटन, इन्फोसिस, हिरो मोटरकॉर्प आणि एशियन पेंट्स या कंपन्यांचे शेअर्स १.७१ टक्क्यांपर्यंत घसरले. याउलट हिंदाल्को, टाटा स्टील, सन फार्मा, डॉ. रेड्डीज आणि जेएसडब्ल्यू स्टील या कंपन्यांचे शेअर्स टॉप गेनर्स होते.

फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे. या बैठकीत व्याजदरवाढीवर निर्णय होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी दोन्ही निर्देशांक किंचित घसरले. New York Stock Exchange वर रात्रभर घसरण होऊनही आज सुरुवातीच्या व्यवहारात आशियाई समभागांमध्ये वाढ झाली. जपानचा निक्केई निर्देशांक ०.०२ टक्क्यांनी वाढला, दक्षिण कोरियाचा कोस्पी ०.२१ टक्क्यांनी वाढला. तर शांघाय कंपोझिट निर्देशांक ०.६३ टक्क्यांनी वाढला आणि हँग सेंग निर्देशांक १.०४ टक्क्यांनी वाढला.

सलग चार सत्रांत वाढ

मंगळवारी सेन्सेक्सने ६१ हजारांचा टप्पा पार केला होता. निफ्टीही वधारुन १८ हजारांवर गेला होता. अमेरिकन बाजारातील तेजी आणि आशियाई बाजारातील सकारात्मक संकेतामुळे काल गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक वातावरण तयार झाले होते. तसेच सोमवारच्या मजबूत विदेशी फंड खरेदीच्या जोरावर सेन्सेक्स ६१ हजारांवर पोहोचला आहे. सेन्सेक्सची ही १० महिन्यांतील उच्च पातळी आहे. जूनच्या मध्यावधीला सेन्सेक्स ५१ हजारांवर होता. तो आता ९ हजार अंकांनी वाढून ६१ हजांरावर गेला आहे. सेन्सेक्स मंगळवारी ३७४ अंकांनी वाढून ६१, १२१ वर बंद झाला. तर निफ्टी १३३ अंकांनी वाढून १८,१४५ वर बंद झाला होता.

हे ही वाचा :

Back to top button