मुंबई महापालिकेतील मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा : नाना पटोले | पुढारी

मुंबई महापालिकेतील मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करा : नाना पटोले

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : राज्यातील भाजपाप्रणित सरकारने मुंबई महापालिकेतील मागील दोन वर्षांतील कामांची कॅग मार्फत चौकशी करण्याचे दिलेले आदेश हे राजकीय द्वेषातून दिलेले आहेत. भाजपाला खरेच भ्रष्टाचार निपटून काढायचा असेल तर फक्त २ वर्षांची चौकशी न करता मागील २५ वर्षांतील कामांची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 पटोले म्हणाले की, भाजप  विरोधी पक्षाला ब्लॅकमेल करतो. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार कसे आले हे सर्वांनी पाहिले आहे. एक तर ईडी, आयकर, सीबीआयच्या कारवाईची भीती दाखवायची नाहीतर पैशाचे आमिष दाखवून आमदार-खासदार फोडायचे, हे त्यांचे काम आहे. मुंबई महापालिकेत दोन वर्षात घोटाळा झाल्याचा भाजपाला आता साक्षात्कार झाला असून, फक्त दोनच वर्षांच्या कामाची चौकशी केली जाणार आहे. भाजपाला जी काही चौकशी करायची ती करू द्या; पण ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, अशी टीकाही त्‍यांनी केली.

मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर भारतीय जनता पक्षही २५ वर्ष सत्तेत होता. या काळात झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी ते का करत नाहीत? चौकशी करायची तर मुळापासून करायली हवी, मात्र केवळ विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी कारवाईची मागणी केली जात आहे, हे राजकीय द्वेषातून सुरु आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावून जनतेत संभ्रम निर्माण करायचा व आपली राजकीय पोळी भाजायची हे भाजपाचे कारस्थान आहे, असा आरोपही पटोले यांनी केली आहे.

 कोरोना काळात मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामाची जगानेही दखल घेतली आहे. मात्र भाजपाला त्यात भ्रष्टाचार दिसत आहे. भाजपाच्या राज्यात कोरोनाकाळात किती भयानक स्थिती होती हे आपण पाहिले आहे; पण स्वतःच्या कारनाम्यांकडे दुर्लक्ष करायचे व विरोधकांवर आरोप करायचे हा खेळ लोकांना समजतो. मुंबईतील जनताही भाजपच्या अशा ब्लॅकमेलिंगला ओळखून आहे, असेही पटोले म्‍हणाले.

     हेही वाचलंत का ?

 

 

Back to top button