कर्नाटक पोलिसांची दडपशाही; कोल्हापुरच्या शिवसैनिकांना कोगनोळी येथे अडवले | पुढारी

कर्नाटक पोलिसांची दडपशाही; कोल्हापुरच्या शिवसैनिकांना कोगनोळी येथे अडवले

कागल, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक राज्यात एक नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळा दिन आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी मशाल आणि भगवा झेंडा घेऊन जाणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी येथे आडविले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही राज्याच्या पोलिसांचा प्रचंड फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा अध्यक्ष विजय देवणे व संजय पवार व रविकिरण इंगवले यांच्यासह कार्यकर्ते कर्नाटकमध्ये एक नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळा दिन आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निघाले होते; पण कर्नाटक पोलिसांनी कर्नाटकात प्रवेश करू न दिल्याने कार्यकर्त्यांनी सीमेवरती ठाण मांडून आंदोलन केले. मशाल आणि भगवा झेंडा घेऊन कर्नाटकात सोडण्यात यावे, अशी विनंती पोलिसांना केली. कर्नाटक पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने पोलीस आणि आंदोलक यांच्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

कोणत्याही परिस्थितीमध्ये भगवा झेंडा आणि मशाल घेऊन कर्नाटकात जाता येणार नाही, अशी अरेरावी कर्नाटक पोलिसांनी केली.  नंतर एक पदाधिकारी भगवा झेंडा आणि मशाल घेऊन जाण्यास पोलीस अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. नंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर दिलेली परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे कर्नाटकात जाण्याचा निश्चय करून आलेले शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दूधगंगा नदीपात्रात उतरून आंदोलन केले.

‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना विजय देवणे आणि संजय पवार म्हणाले की, मराठी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे. भगवा झेंडा हिंदूंचे प्रतीक आहे. हा झेंडा आणि मशाल घेऊन जाताना सीमेवर अडवले असले तरी उद्या कोणत्याही प्रकारे बेळगावात जाणार आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हुकूमशाही आणि दडपशाही सुरू केली आहे. पोलिसांमार्फत भारतीय जनता पक्ष दडपशाहीचे काम करत आहे. ही दडपशाही लवकरच लोक उलथून टाकतील, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलनामुळे एक तासाहून अधिक काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

हेही वाचा

Back to top button