गोवा : भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद – गिरीश चोडणकर | पुढारी

गोवा : भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद - गिरीश चोडणकर

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  कन्याकुमारी ते जम्मू अशी भारत जोडो पदयात्रा असून, भाजपने ज्या लोकांना विभागले आहे, त्यांना एकत्र आणण्यासाठी ही यात्रा लाभदायक ठरत असून, भाजपविरोधी विविध घटकांचा तथा युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या यात्रेला मिळत असल्याचे प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोड यात्रेमध्ये गिरीश चोडणकर हे सहभागी झाले. काही दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष अमित पाटकर यांनीही या पदयात्रेत भाग घेतला होता. शुक्रवारी (दि.28 रोजी) चोडणकर यांनी सहभाग घेतला व राहुल गांधी यांच्यासोबत काही कि. मी. अंतर चालले. तेलंगणातील महबूबनगर येथे चोडणकर यांनी यात्रेत भाग घेतला व पत्रकार परिषद घेतली. भाजप सरकारला कंटाळलेले विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होत असल्याचे सांगून भारताला फुटीरतावादी शक्तींपासून वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी पदयात्रा सुरू केली आहे, असेही चोडणकर यांनी सांगितले आहे.

किनारी भाग उद्ध्वस्त करण्याचा डाव : फर्नांडिस

पर्यावरण मंत्रालय गोवाने सीआरझेड 2019 मध्ये बदल करण्याचे ठरवले आहे. त्याद्वारे किनारी भागातील घरे मोडून उद्योगपतींना जागा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते वेरियतो फर्नांडिस यांनी केला. शनिवारी पणजी येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा आरोप केला. लोकांना विश्वासात घेऊनच बदल करावेत, अशी मागणी त्यांनी केली. सीआरझेडमध्ये बदल करून किनारी भागातील वाळू काढण्याचा सरकारचा डाव असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी मोरेन रिबेलो व संजय बर्डे उपस्थित होते.

Back to top button