पुढारी ऑनलाईन : शिंदे-फडणवीस सरकारने मविआच्या काळात घेण्यात आलेले निर्णय, प्रकल्प आणि कामकाजाला धक्के देत, अनेक बदल केले आहेत. दरम्यान, तत्कालीन मविआ सरकारच्या काळातील अनेक विकासकामांना शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यानंतर शिंदे सरकारने पर्यटन खात्याशी संबंधित सुमारे हजारो कोटींच्या विकासकामांना स्थगिती देत, आता थेट माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनाच धक्का दिला आहे.
जुलैमध्ये, एक जीआर जारी करण्यात आला आणि मविआ सरकारच्या काळात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पर्यटन आणि संस्कृती विभागासासह इतर विभागातील प्रकल्पांवर काम थांबवण्यात आले. नंतर २ नोव्हेंबर रोजी एका जीआरने विभागाच्या काही प्रकल्पांना पुढे जाण्यास परवानगी दिली होती.
महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा १७ नोव्हेंबरला नवीन जीआर (शासकीय ठराव) जारी केला. यानुसार पूर्वी पर्यटन विभागातील कामांना देण्यात आलेली परवानगी पुन्हा स्थगित करण्यात आली. पर्यटन मंत्रालयातील मविआ सरकारच्या प्रकल्पांना 2 नोव्हेंबरला जीआर काढत, या प्रकल्पांना परवानगी दिली होती. मात्र काल पुन्हा नवीन जीआर काढत पर्यटन विभागाच्या विकासकामांना शिंदे सरकारकडून स्थगिती दिली आहे. यामुळे आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) महत्त्वकांक्षा असलेले प्रकल्प शिंदे फडणवीस सरकारकडून रद्द करण्यात आले आहे.