पुणे : डॉ. धनराज माने अखेर पायउतार; डॉ. शैलेंद्र देवळाणकर राज्याचे नवे उच्च शिक्षण संचालक | पुढारी

पुणे : डॉ. धनराज माने अखेर पायउतार; डॉ. शैलेंद्र देवळाणकर राज्याचे नवे उच्च शिक्षण संचालक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने हे संचालकपदावर काम करण्यास अपात्र आहेत, असा वैद्यकीय अहवाल मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाने दिला होता. त्या पार्श्वभूमीवर दैनिक पुढारीने डॉ. धनराज माने यांच्या अडचणी वाढणार या मथळ्याखाली 9 नोव्हेंबरला वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर आता त्यांच्या जागेवर शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्थेचे (अमरावती) सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. माने यांच्यासाठी अधिसंख्यपद तयार करून त्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे डॉ. माने संचालकपदावरून पायउतार झाल्याचे अखेर स्पष्ट झाले आहे. डॉ. माने उच्च शिक्षण संचालकपदी काम करण्यास अक्षम असल्याबाबत कॉप्स संघटनेचे अमर एकाड यांनी मुंबईत उपोषण केले होते. त्यानंतर डॉ. माने यांची जे. जे. रुग्णालयामार्फत वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिला.

तपासणीनंतर डॉ. माने यांना दृष्टिदोष असल्याचे जे. जे. रुग्णालयाकडून प्रमाणित करण्यात आले. त्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंदर्भातील शासननिर्णय प्रसिद्ध केला आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमांतर्गत प्राप्त संरक्षणानुसार डॉ. माने यांना सेवा संरक्षणासहित सर्व लाभ देण्यात येणार आहेत. त्यासाठी उच्चस्तरीय समितीच्या कार्योत्तर मान्यतेच्या अधीन राहून डॉ. माने यांच्यासाठी अधिसंख्य पद निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली.

डॉ. माने यांचा उच्च शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांच्याकडे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीचे कामकाज सोपविण्यात आल्याचे शासननिर्णयात नमूद करण्यात आले आहे. डॉ. माने यांच्या अधिसंख्य पदावरील नियुक्तीमुळे रिक्त झालेल्या उच्च शिक्षण संचालकपदाची जबाबदारी डॉ. देवळाणकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांना संचालकपदी रुजू होण्याचा आदेशही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिला आहे.

कोण आहेत डॉ. देवळाणकर…
डॉ. शैलेंद्र देवळाणकर अमरावतीतील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत सहयोगी प्राध्यापक (राज्यशास्त्र) पदावर काम करत आहेत. शिवाय मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिवपदाची सूत्रेही त्यांच्याकडे होती. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे ’ओएसडी’ म्हणूनही डॉ. देवळाणकर यांनी काम सांभाळले होते. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणूनही ते परिचित आहेत.

Back to top button