पुढारी ऑनलाईन: देश आणि राज्यपातळीवरील महत्त्वाच्या नेत्यांची नक्कल केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सात नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ ऑक्टोबरच्या ठाण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली.
ठाण्यातील सभेत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटातील मुख्य पदाधिकारी आणि नेत्यांवर नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नेत्यांविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम १५३,५०० आणि ५०४ अंतर्गत हा गुन्हा दाखल केल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे.
ठाकरे गटातील सुषमा अंधारे, भास्कर जाधव, विनायक राऊत, केदार दिघे, राजन यांसह अनेक महत्त्वाच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात काढलेल्या महाप्रबोधन यात्रेत भाषणादरम्यान या नेत्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. या नेत्यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे मोठे नेते यांच्यावर आपल्या भाषणात त्यांची नक्कल करत त्याच्यावर टिका देखील केली होती. या कारणाने शिवसेनेच्या या मुख्य नेत्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.