सातारा : भाजप आणि 50 खोकेवाल्यांचे हिंदुत्व बेगडी : आ. अमोल मिटकरी | पुढारी

सातारा : भाजप आणि 50 खोकेवाल्यांचे हिंदुत्व बेगडी : आ. अमोल मिटकरी

वडूज; पुढारी वृत्तसेवा : भाजप व त्याचे समर्थन करणार्‍या अनेकांना हनुमान चालीसा, रामरक्षा तरी येते का? याचे त्यांच्या पक्षनेतृत्वाने आत्मचिंतन करावे. भाजप आणि 50 खोकेवाल्यांचे हिंदुत्व बेगडी आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अमोल मिटकरी यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, लम्पी रोगावरील लस गुजरातमध्ये अधिक प्रमाणात पाठवली जात असून त्यामध्येही यांनी काळाबाजार केला असल्याचा आरोपही आ. मिटकरी यांनी केला. वडूज (ता.खटाव) नजिकच्या सातेवाडी येथे खटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जनसंपर्क अभियान व कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. दिपक चव्हाण, ज्येष्ठ नेते प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनिल माने, तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे, प्रदिप विधाते, सुरेंद्र गुदगे, बाळासाहेब सोळसकर, जितेंद्र पवार, प्रा. बंडा गोडसे, संदिप मांडवे, श्रीमती शशिकला देशमुख, कविता म्हेत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. अमोल मिटकरी म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आचार, विचारांवर कार्यरत असणारा पक्ष आहे. पक्षाने राज्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकर्‍यांच्या हिताचे कायम निर्णय घेतले. कोरोना काळात आरोग्य, अर्थ खाते यशस्वीरित्या सांभाळल्याने त्याची दखल देशातील कॅग संस्थेने घेतली. राज्यात सर्वाधिक आत्महत्या हिंदु धर्मातील लोक करत आहेत. त्याकडे या हिंदुत्ववादी लोकांचे दुर्लक्ष आहे. हिंदू धर्मातील विचार, सामाजिक भान, अध्ययनही त्यांच्याकडे दिसत नाही. सध्या राज्यात सत्तेत आलेल्या सरकारमध्ये कोणालाच कोणाचा मेळ नसल्याचा कारभार सुरू आहे. कोणते खाते कोणाकडे आहे, हे जनतेलाही समजले नाही. राज्यात सध्या थैमान घातलेल्या लम्पी रोगातून पशुधन वाचवण्यासाठी लसीचा योग्य प्रमाणात पुरवठा केला जात नाही. याउलट गुजरातमध्ये तो पाठवला जातो, त्यामध्येही यांनी काळाबाजार केला असल्याचा आरोपही मिटकरी यांनी केला.

खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य घटकांसाठी लढणार्‍या कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी राष्ट्रवादीमुळे मिळाली. तालुक्यावर राष्ट्रवादीचे असणारे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आगामी काळात कार्यकर्त्यांनी दक्ष रहावे. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, खटाव तालुक्यातील एक सेनापती दुसरीकडे गेला असला तरी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अजूनही एकसंघ आहेत. 50 खोक्यांमध्ये आमच्याही भागातील एक जण सहभागी आहे. खटाव तालुक्यात इतिहास घडवण्याची ताकद आहे. तालुक्यातील राष्ट्रवादीची ताकद आगामी काळात कायम ठेवावी. शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. केंद्र व राज्यातील हुकूमशाही प्रवृत्तींना कायमचे घरी बसवण्यासाठी उद्याच्या क्रांतीची ही मशाल पेटवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल.

तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे म्हणाले, खटाव तालुक्यावर राष्ट्रवादीच्या विचारांचा कायम प्रभाव राहीला आहे. त्यामुळे आगामी काळात तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू. तालुक्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची ताकद एकसंघ आहे. यावेळी प्रभाकर देशमुख, सुनिल माने, प्रदिप विधाते, प्रा. बंडा गोडसे, संदिप मांडवे, जितेंद्र पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. स्वागत माजी उपसभापती संतोष साळुंखे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत कुलकर्णी यांनी केले. आभार प्रा. एस. पी. देशमुख यांनी मानले. मेळाव्यास राष्ट्रवादी खटाव तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button