ठाकरे की शिंदे सोबत; मिलिंद नार्वेकरांचे सूचक ट्विट | पुढारी

ठाकरे की शिंदे सोबत; मिलिंद नार्वेकरांचे सूचक ट्विट

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येणार असल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असताना आता नार्वेकर यांनी सूचक ट्विट करत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीची पाहणी केल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवात मिलिंद नार्वेकर यांच्या घरी गेले होते. त्यानंतर नार्वेकर शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा होती. त्यानंतर गुलाबराव पाटील यांनीही मिलिंद नार्वेकर यांच्या शिंदे गटाच्या प्रवेशाबाबत खळबळजनक वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. आम्ही ५० खोके घेतले असतील. बाळासाहेबांची आयुष्यभर सेवा केलेला चंपासिंह थापा आमच्याकडे आला. आता मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येत आहेत, अशी चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर नार्वेकर यांनी आज ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची शिवतीर्थावर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली. तसेच येथे असलेल्या बंगाल क्लबच्या दुर्गोत्सवास भेट दिली व माँ दुर्गेचे दर्शन घेतले. नार्वेकरांच्या या ट्विटमुळे ते आता उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा :

Back to top button