मुंबई : विलेपार्लेत ७ घरे कोसळली; महापालिकेने झाेपडीधारकांचे स्‍थलांतर केल्‍याने जिवितहानी टळली | पुढारी

मुंबई : विलेपार्लेत ७ घरे कोसळली; महापालिकेने झाेपडीधारकांचे स्‍थलांतर केल्‍याने जिवितहानी टळली

मुंबई; पुढारी वृत्तसेवा: विलेपार्ले येथील इंदिरा नगर – १ मधील नाल्यालगत असलेली तळमजला ते एक मजली असलेली ७ घरे रविवारी रात्री कोसळली. या दुर्घटनेच्‍या एक दिवस आधीच पालिकेने झोपडीधारकांचे स्थलांतर केल्‍याने जिवितहानी टळली..पालिका के.पश्चिम विभागाने येथील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात कन्नाक आश्रम आणि पालिका शाळेत स्थलांतरित केले आहे.

विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू रोड येथील मिठीभाई कॉलेजलगत इंद्रिरा नगर – १ झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीच्या नाल्यालगत असलेल्या संरक्षण भितीवरील सुमारे ७ घरांना शनिवारी तडे गेल्याचे स्थानिकांनी महापालिका के.पश्चिम विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते. यामुळे शनिवारी स्थानिक माजी नगरसेविका सुनिता राजेश मेहता आणि पालिका के.पश्चिम विभागातील अभियंता यांनी संयुक्तरित्या तडे गेलेल्या घरांची पाहणी केली.

यानंतर रहिवाशांची समजूत काढून त्यांना घरे खाली करण्यास भाग पाडले गेले घरे कोसळल्याआधीच खाली केल्याने मोठी जिवितहानी टळली. या दुर्घटनेनंतर येथील नाल्यालगत असलेल्या इतर घरांचीही सुरक्षा ऐरणीवर आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर पालिकेने या सर्व घरांचे सर्व्हेक्षण करून, त्यांचे इतरत्र स्थालांतर करण्याची मागणी इंद्रिरा नगर – १ मधील रहिवाशांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Back to top button