शिवकालीन अंबाबाई देवीचा नवरात्रोत्सव; धायरीत आजपासून विविध धार्मिक कार्यक्रम | पुढारी

शिवकालीन अंबाबाई देवीचा नवरात्रोत्सव; धायरीत आजपासून विविध धार्मिक कार्यक्रम

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: धायरी, सिंहगड भागाची स्फूर्तीदेवता म्हणून प्रसिद्ध असलेल्या धायरी येथील शिवकालीन अंबाईमाता देवीचा नवरात्रोत्सव दोन वर्षांनंतर यंदा पारंपरिक, ऐतिहासिक रिवाजात भव्यतेने साजरा करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पाणी, दर्शन मंडप आदींची सोय केली आहे. तसेच, महापालिका प्रशासनानेही रस्त्यांची डागडुजी केली आहे.

देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील, विश्वस्त चंद्रकांत वांजळे, भाऊसाहेब कामठे, माजी सरपंच मदन भोसले, सोपान लायगुडे, बाजीराव चौधरी, चंद्रकांत पोकळे, हिरामण पोकळे, बाळासाहेब कामठे आदींसह ग्रामस्थांच्या देखरेखीखाली नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. धायरी गावाच्या शेजारील डोंगराच्या कुशीत देवीचे मंदिर आहे. देवीच्या नवरात्र उत्सवास शिवकाळापासून साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. देवीची मूर्ती सुबक व दगडी पाषाणाची आहे.

जागृत देवस्थान अशी परिसरात ओळख आहे. दोन वर्षे कोरोना संसर्गामुळे नवरात्रोत्सव साधेपणाने करण्यात आले आहेत. यंदा भव्यदिव्य ऐतिहासिक रिवाजात उत्सव साजरा केला जात आहे. सर्व जाती-धर्माचे एक लाखाहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी सांगितले. सोमवारी (दि. 26) नवरात्रोत्सवास पारंपरिक घटस्थापनेने सुरुवात होणार आहे. आरती, जागर, प्रवचन आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली आहे.

वडजाई माता मंदिरामध्ये विविध कार्यक्रम
खडकवासला : सिंहगड रोडवरील नांदेड येथील शिवकालीन ग्रामदैवत श्री वडजाई माता देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. 26) घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. होमहवन, भजन, कीर्तन आदी धार्मिक तसेच ग्रुप, सोलो डान्स स्पर्धा, मराठी-हिंदी गीते, असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अखिल नांदेडगाव वडजाई माता नवरात्रोत्सव समिती व ग्रामस्थांच्या वतीने उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली असून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

 

 

 

 

 

Back to top button