Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; गॅसचा टँकर नदीत कोसळल्याने चालक ठार | पुढारी

Accident : मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; गॅसचा टँकर नदीत कोसळल्याने चालक ठार

नाणीज (रत्नागिरी); पुढारी वृत्तसेवा : मुंबई – गोवा महामार्गावरील अंजनारी (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील पुलावरून भारत पेट्रोलियमचा गॅसने भरलेला टँकर नदीत कोसळला (Accident). या दुर्घटनेत चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गॅसने भरलेला हा टँकर नदीत कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेनंतर गॅस गळती सुरू झाल्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.

या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, एक टँकर (एमएच १२-एल टी-६४८८) घरगुती गॅस घेऊन जयगडहून गोव्याच्या दिशेने जात होता. अंजनारी येथील उतार उतरत असताना चालकाचा ताबा सुटल्याने टँकर नदीत कोसळला. यामध्ये चालक प्रमोद जाधव (रा. उस्मानाबाद) यांचा बुडून मृत्यू झाला. हा अपघात (Accident) दुपारी अडीचच्या सुमारास घडला. मृत चालकाला लांजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. गॅस गळतीमुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. हातखंबा येथील वाहतूक शाखेचे पोलीस, लांजा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच फिनोलेक्स, जिंदाल या कंपन्यांची सुरक्षा पथके, लांजा अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. भारत गॅसचे पथक गोव्याहून निघाले असल्याने ते आल्यानंतर पुढील उपाययोजना होतील व त्यानंतर वाहतूक सुरू पुर्ववत होईल, असे सांगण्यात येत आहे.

अपघाताची भीषणता इतकी मोठी आहे की, टँकरचे तुटलेले सांगाडे तीन ठिकाणी पडले होते. टँकरचे टॅंक व इंजिन बॉडी असे दोन भाग झाले आहेत. एक भाग पुलाचा कठडा तोडून तो खाली गेला आहे तर दुसरा भाग पुलावरच अडकला आहे.

अपघातस्थळी जगद्गुरू नरेन्द्राचार्य महाराज संस्थानचे चालक धनेश केतकर यांनी स्थानिक व्यक्तींच्या मदतीने गॅस गळती सुरू असताना धाडस करून चालकाला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने लांजा येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

हेही वाचा

 

Back to top button