चाकण : जडीबुटीची विक्री; चार लाखांचा गंडा | पुढारी

चाकण : जडीबुटीची विक्री; चार लाखांचा गंडा

चाकण : पुढारी वृत्तसेवा : लोकांना दृष्टी येईल, मुके बोलू लागतील, मणक्याचे आजार बरे होतील, संतती प्राप्त होईल, अशा बहाण्याने जडीबुटीची विक्री करून चार लाखांचा गंडा घालणार्‍या तिघांना चाकण पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यासह आणखी एका डॉक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 9 मे ते 28 ऑगस्ट या कालावधीत माणिक चौक चाकण येथील कृष्णा आयुर्वेदिक जडीबुटी भांडार येथे घडली. अश्विनी दत्तात्रय शिंदे (वय 26, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, प्रेमराज उमाजी गोसावी (वय 19), संजीव लिंबाजी गोसावी (वय 30) आणि विश्वजित लिंबाजी गोसावी (वय 22, रा. चाकण) या तिघांना अटक केली असून, डॉ. जाधव यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना चार लाख रुपयांची आयुर्वेदिक औषधे दिली. त्याचा फिर्यादी यांना काहीही परिणाम झाला नाही. आरोपींनी फिर्यादी यांच्यासह अन्य लोकांना दृष्टी येईल, मुके बोलू लागतील, मणक्याचे आजार बरे होतील, संतती प्राप्त होईल, अशा बहाण्याने गंडा घातला आहे. पोलिसांनी प्रेमराज, संजीव आणि विश्वजित या तिघांना अटक केली आहे. चाकण पोलिस याबाबत तपास करीत आहेत.

Back to top button