औरंगाबाद : दोन वर्षांच्या खंडानंतर भरणार कर्णपुरातील तुळजाभवानीची यात्रा; ३५० वर्षांची परंपरा | पुढारी

औरंगाबाद : दोन वर्षांच्या खंडानंतर भरणार कर्णपुरातील तुळजाभवानीची यात्रा; ३५० वर्षांची परंपरा

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक नगरी औरंगाबादेतील कर्णपुरा येथे 350 वर्षांपासून स्थापित असलेले आई तुळजाभवानीचे प्राचिन मंदिर आहे. तेव्हापासून या ठिकाणी दरवर्षी नवरात्रीमध्ये शहरातील सर्वात मोठा यात्रामहोत्सव भरतो. देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर यात्रा भरणार असून यात्रेची तयारी अंतिम टप्यात आहे.

मुघलांच्या सैन्यासह दख्खनेत आलेल्या बिकानेर येथील राजा कर्णसिंह यांनी खामनदीच्या पूर्वेला आपल्या लवाजम्यासह छावणी टाकली. तेथेच त्यांनी कर्णपुरा, केसरसिंहपुरा, पदमपुरा ही गावे वसवली. याच राजा कर्णसिंह यांनी 1660 साली करणीमातेची स्थापना केली. या कर्णपुरा येथील मंदिराला तीनशे पन्नास वर्षांचा इतिहास आहे. आजही येथे उत्साहात यात्रा भरते.

कर्णपुऱ्यातील दानवे कुटुंबाकडे या मंदिराचे पुजारीपण आहे. दोन वर्षांच्या कर्णपुरा परिसर नवरात्र महोत्सवासाठी सज्ज झाला असुन यात्रेत रहाटपाळणे, ड्रॅगन, मौत का कुआ, क्रॉस व्हील पाळणा, ब्रेक डान्स, अशी खेळणी, गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावण्याची लगबग सुरू झाली आहे. कर्णपुरा देवीची सोमवारी पहाटे तीन वाजता महापूजा करण्यात येईल. सकाळी सात वाजता आरती होईल. भक्‍तांना दर्शनासाठी गैरसोय होऊ नये, रांगेत दर्शन घेता यावे, यासाठी यात्रा व्यवस्थापन समितीने नियोजन केले आहे. पहाटेपासूनच पंचक्रोशीतील भाविकांची दर्शनासाठी मोठी रीघ येथे लागणार आहे.

विजयादशमीच्या दिवशी सीमोल्लंघन..

गोविंदा.. गोविंदा.. व्यंकटरमणा.. गोविंदा’च्या भावपूर्ण निनादाने संपूर्ण कर्णपुरा परिसर विजयादशमीच्या दिवशी दणाणून निघतो. कर्णपुरा यात्रेत परंपरेप्रमाणे विजयादशमीच्या दिवशी सायंकाळी बालाजीचा रथ ओढून सीमोल्लंघन करण्यात येते. आबालवृद्धांच्या आणि महिलांच्या लक्षणीय सहभागाने विजयादशमीचा सांगता उत्सव नेहमीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो. सायंकाळी कर्णपुरा देवीच्या आरतीनंतर बालाजी मंदिरात आरती करून रथयात्रेला प्रारंभ करण्यात येतो. सुंदर रंगरंगोटी केलेल्या बालाजीच्या रथाला दोरखंड बांधण्यात येते. मंदिराकडून सीमोल्लंघनासाठी निघालेला रथ व बालाजीच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी करतात. बालाजीचा रथ दोरखंडांनी ओढत ओढत पंचवटी चौकापर्यंत आणला जातो. पंचवटी चौकात रथ येताच आरती करण्यात येते आणि सीमोल्लंघन करून पुन्हा रथ मंदिराकडे निघातो. रात्री रथ मंदिरापर्यंत आला की आरतीने मिरवणुकीची सांगता केली जाते.

Back to top button