

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील विविध बँकांची 22 हजार 842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या एबीजी शिपयार्ड कंपनीच्या 2747 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचलनालयाने टाच आणली आहे. घोटाळा प्रकरणी ईडीने कंपनीचे संस्थापक ऋषी अग्रवाल यांना अलिकडेच अटक केली होती. ईडीने टाच आणलेल्या संपत्तीमध्ये डॉकयार्ड, शेतजमीन, व्यावसायिक मालमत्ता तसेच बँकांतील ठेवींचा समावेश आहे.
गुजरातमधील सुरत आणि दहेज येथे एबीजी शिपयार्डचे डॉकयार्ड आहे. याशिवाय एबीजी आणि तिच्याशी संलग्न असलेल्या कंपन्यांच्या महाराष्ट्र, गुजरातमध्ये शेतजमिनी व बँकांमध्ये ठेवी आहेत. या सर्वांवर ईडीने टाच आणली आहे. कंपनी चालविण्याबरोबरच विस्तारीकरणाच्या नावाखाली ऋषी अग्रवाल याने आयसीआयसीआय बँकेच्या नेतृत्वाखाली इतर बँकांकडून प्रचंड प्रमाणात कर्ज घेतले होते. नंतर हे कर्ज न फेडता बँकांची सुमारे 22 हजार 842 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अग्रवाल व त्याच्या सहकार्यांवर आहे. बँकांकडून घेण्यात आलेले कर्ज विदेशात वळविण्यात आल्याचेही तपास संस्थांचे म्हणणे आहे.
एबीजी शिपयार्डबरोबर त्याच्याशी संबंधित असलेली बेर्मेको एनर्जी सिस्टिम्स कंपनी, एबीजीचे अधिकारी धनंजय दातार, सविता दातार, कृष्णगोपाल तोष्णीवाल, विरेन आहुजा यांची संपत्ती ताब्यात घेण्यात आली आहे. स्टेट बँकेने केलेल्या तक्रारीची दखल घेत एबीजी घोटाळा प्रकरणी सीबीआयने गेल्या फेबु्रवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. स्टेट बँकेचे एबीजीवर असलेले कर्ज 2469 कोटी रुपयांचे आहे. एकूण 28 बँकांकडून ऋषी अग्रवाल याने कर्ज उचलले होते.
हेही वाचा