उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरूदन; देवेंद्र फडणवीसांची टीका | पुढारी

उद्धव ठाकरेंचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरूदन; देवेंद्र फडणवीसांची टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरेंचं कालचे भाषण म्हणजे निराशेचं अरण्यरूदन होते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर केली आहे. नागपूर विमानतळावर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. शिवेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये बुधवारी गटप्रमुखांचा मेळावा घेऊन आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. या मेळाव्यात ठाकरे यांनी हिंमत असेल तर महिनाभरात मुंबई महापालिका आणि त्याबरोबरच विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा, अशा शब्दांत शिंदे-फडणवीस सरकारवर जारदार घणाघात केला.

याला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज प्रत्युत्तर दिले. आमच्या सोबत निवडून येवून आमच्याच पाठीत खंजीर खूपसला. तेव्हा राजीनामे देवून निवडणूका का घेतल्या नाही. तुम्ही कॉग्रेस राष्ट्रवादीसोबत निवडून आला नव्हता, तर नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून निवडणूक लढवली होती. हिंमत होती तर तेव्हा निवडून येवून काॅंग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं होतं. कालच भाषण निराशेचं होतं, असा पलटवार त्यांनी केला आहे.

यापुढेही मला कोणी संपवू शकणार नाही

कालच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची शेवटची निवडणूक असल्याची टीका केली होती. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला. केवळ एकट्यानेच नव्हे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन तिघांनी मिळून एकत्रितपणे अडिच वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण संपवू शकले नाहीत. आणि यापुढेही संपवू शकणार नाही “मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है” अशा शब्दात फडणवीस यांनी ठाकरे यांना आपल्याला कोणी संपवू शकत नाही असे सुनावले. उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरूदन होते, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button