शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना BMC ने परवानगी नाकारली

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाच्या माध्यमातून केलेले दोन्ही अर्ज महापालिकेने नाकारले. गणेश विसर्जनाच्यावेळी शिवसेना अणि शिवसेना शिंदे गटात झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमी या दोन्ही गटांना परवानगी नाकारण्यात आलीय. दोन्ही गटाला महापालिकेने गुरुवारी सकाळी तसे लेखी कळवले.
शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने अनिल देसाई यांनी २२ ऑगस्ट रोजी महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे अर्ज केला होता, तर त्यानंतर काही दिवसांनी शिंदे गटाचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनीही शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी परवानगीकरता अर्ज दाखल केला होता. हे दोन्ही अर्ज महापालिकेकडे परवनगीच्या प्रतीक्षेत होते.
दरम्यान, शिंदे गटाला वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळाल्यानंतर शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत, उपनेते मिलिंद वैद्य यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जी उत्तर विभागाकडे याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये जी उत्तर विभागाने या परवानगीबाबत विधी विभागाकडे अभिप्राय मागवण्यात आल्याचे लेखी उत्तर शिवसेनेला दिले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेला पोलीस उपायुक्तांकडून पत्र प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये त्यांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्यावेळी दोन्ही शिवसेना गटांमध्ये झालेली हाणामारी आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी दादर पोलीस ठाण्याबाहेर दोन्ही गटांमध्ये घडलेल्या घटनांचा संदर्भ देत आजही दोन्ही गटांमध्ये वाद शमलेला नसल्याचे या पत्रात म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. अशा परिरिस्थितीत शिवाजी पार्कसारख्या संवेदनशील परिसरात दोन्ही गटापैंकी एकाला परवानगी दिल्यास त्यामुळे या परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे या पत्रात म्हटले असल्याचे कळते.