कोल्हापूर : देशात इथेनॉलनिर्मिती एक हजार कोटी लिटरच्या उंबरठ्यावर | पुढारी

कोल्हापूर : देशात इथेनॉलनिर्मिती एक हजार कोटी लिटरच्या उंबरठ्यावर

कोल्हापूर; राजेंद्र जोशी :  किफायतशीर दर आणि साखरेच्या जागतिक बाजारातील अस्थिरता यामुळे देशातील अधिकाधिक ऊस इथेनॉलकडे वळविण्याचे सत्र सुरू झाल्यामुळे भारताची इथेनॉलनिर्मितीची वार्षिक क्षमता एक हजार कोटी लिटरच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. नुकत्याच संपलेल्या इथेनॉल वर्षामध्ये देशातील इथेनॉलनिर्मितीने 923 कोटी लिटरपर्यंत झेप घेतली आहे. नव्याने सुरू होणार्‍या हंगामात सुमारे 45 लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाण्याचे नियोजन असल्याने इथेनॉलनिर्मितीचा एक हजार कोटी लिटरचा टप्पा लिलया पार होईल, असे चित्र आहे.

पेट्रोलमधील 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत एका परिसंवादात केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठामंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी इथेनॉलनिर्मितीच्या धोरणामुळे कार्बन संयुगांच्या उत्सर्जनास रोख लावण्यास मोठी मदत होईल. शिवाय, इंधनावर खर्ची पडणार्‍या वार्षिक परकीय चलनापैकी 30 हजार कोटी रुपयांचे परकीय चलन वाचणार आहे, असेही ते म्हणाले.

भारतामध्ये गेली 7 वर्षे मोठ्या ताकदीने इथेनॉलनिर्मितीचे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे साखर उद्योगाचे बिघडणारे अर्थकारण बर्‍याच अंशी सावरले आहे. शिवाय, देशाच्या अर्थकारणालाही मोठी मदत होत आहे. देशात नुकतेच पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे 10 टक्क्यांचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. यामुळे साखर कारखानदारीला 18 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाला. 2025 पर्यंत केंद्र शासनाने 20 टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. यामधून साखर कारखानदारीला निव्वळ अतिरिक्त 35 हजार कोटी रुपयांचा महसूल उपलब्ध होईल, असे गोयल यांनी स्पष्ट केले आहे. भारतीय शेतकरी आजपर्यंत देशात अन्नदाता अशी भूमिका बजावित होता. आता ही भूमिका बजावित असतानाच त्याने ऊर्जादाता ही नवी भूमिका सक्षमपणे पेलण्यास सुरुवात केली आहे.

आत्मनिर्भर भारत योजनेचे यश

भारतीय अन्न महामंडळाच्या पथकाने ही पाहणी केली. केंद्राच्या सायंटिफिक अँड इडस्ट्रियल रिसर्च संस्थेच्या पथकाने ‘प्राज’च्या या संशोधनावर मान्यतेची मोहोरही उमटविली आहे. ‘प्राज’च्या संशोधन केंद्रामध्ये एकूण 90 संशोधक यासाठी कार्यरत आहेत. एकूणच भारतीय इथेनॉल उद्योग यशाचा एकेक टप्पा सर करत आहे, हे आत्मनिर्भर भारत योजनेचे यश समजले जात आहे.

Back to top button