पुणे : नोंदणी विभागातील 900 पदे भरणार; महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची माहिती | पुढारी

पुणे : नोंदणी विभागातील 900 पदे भरणार; महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधकांपासून कर्मचार्‍यांपर्यंत रिक्त असलेली सुमारे 900 पदे येत्या दोन ते तीन महिन्यांत भरण्यात येणार आहेत. राज्यातील नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधक श्रेणी वर्ग 1 पदाची अनेक पदे रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांवर दुय्यम निबंधकाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकार्‍यांनी दस्तनोंदणी करताना नियम धाब्यावर बसविले. त्यातून बेकायेदशीर पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

शहरात दहा हजारांहून अधिक बोगस रेरा, तसेच तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून दस्तांची नोंदणी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या दस्तनोंदणीद्वारे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 44 दुय्यम निबंधकपदावरील अधिकार्‍यांवर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबनाची कारवाई केली.

पुणे शहरात आजमितीला 27 तर ग्रामीण भागात 21 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात दस्तांची नोंदणी केली जाते. पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये विविध पदे रिक्त आहेत, तर काही पदांवरील अधिकारी व कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदावरील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची पदे रिक्त होणार आहेत. काही  अधिकारी निवृत्त होत आहेत. परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, यासाठी येत्य दोन ते तीन महिन्यातं नऊशे पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली.

…या पदांचा समावेश
याबाबत माहिती देताना हर्डीकर म्हणाले की, कनिष्ठ लिपिकांची 521 तसेच शिपाईची 284 तसेच दुय्यम निबंधक श्रेणी 1 ची सुमारे 78 अशा सुमारे नऊशे पदांचा समावेश आहे. सध्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कामाचा ताण वाढत आहे. राज्य सरकारने ही रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यांत ही पदे भरण्यात येणार आहेत.

Back to top button