‘फॉक्सकॉन’बाबत केंद्राच्या दबावामुळेच राज्याने निर्णय घेतला :आदित्य ठाकरे | पुढारी

'फॉक्सकॉन'बाबत केंद्राच्या दबावामुळेच राज्याने निर्णय घेतला :आदित्य ठाकरे

मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क : फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात आम्ही आणणार होतो; पण तो आमच्या हातातून गेलाय. आता तो आंध्र प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेशात गेला आहे. आता कंपनीवाले आम्ही महाराष्ट्रात येऊ इच्छित नसल्याचे म्हणत आहेत. केंद्राच्या दबावामुळेच राज्याने निर्णय घेतला, असा आरोप  शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत विधानसभेत चुकीची माहिती देणारे मुख्यमंत्री कसले? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.  या वेळी माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

व्हॉट्स ॲपवरून खोटी माहिती फिरवली जातेय. उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना ही माहितीच नसेल. तरुणांच्या रोजगाराची जबाबदारी कोण घेणार?. मुख्यमंत्री फक्त मंडळांना भेटी देताहेत. प्रकल्पाबाबत विधानसभेत चुकीची माहीती दिली जातेय. विधानसभेत प्रकल्पाची चुकीची माहिती देणारे मुख्यमंत्री कसले? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

रायगडमधील बल्क ड्रग पार्कही महाराष्ट्राबाहेर गेला.  सरकारने अद्याप याचा खुलासा केलेला नाही. बाळासाहेब ठाकरे क्लिनिकचा श्रेय घेण्याचा प्रयत्न सरकारने केला. श्रेय घ्या पण लोकांची कामे तरी करा. असेच प्रकल्प जात राहिले तर शिंदे सरकार बोलतील का? महाराष्ट्रातील जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल का? मुख्यमंत्री गणेशदर्शनात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री आता नवरात्रौत्सवात व्यस्त होतील. मंडळात फिरण्यासोबत थोडं कामही करावं. मोठे प्रकल्प निसटून जाताहेत. उद्योगमंत्र्यांना अधिकारी चुकीची माहिती देत असतील. उद्योगमंत्र्यांनी तरी उत्तर द्यावं, असे आवाहनही आदित्य ठाकरेंनी केले.

२६ जुलै रोजी वेदांताचे शिष्टमंडळ मुंबईत येऊन एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना भेटलं होतं. त्याबाबतच्या बातम्याही माध्यमातून  आल्या आहेत. अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले. या प्रकल्पामुळे तरुणांना रोजगार मिळणार होता. महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली गेलीत. भविष्यात असे प्रकल्प जाण्याची भीती आहे. फॉक्सकॉन प्रकल्पाची साडेतीन हजार कोटींची गुंतवणूक होती. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. आता तरुणांच्या बेरोजगाराची जबाबदारी कोण घेणार?, असा सवाल माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केला.

हेही वाचा :

Back to top button