पिंपळी- झारगडवाडी परिसरात आढळलेला प्राणी हा तरस, बिबट्या नसल्याचे वनविभागाकडून स्पष्टीकरण | पुढारी

पिंपळी- झारगडवाडी परिसरात आढळलेला प्राणी हा तरस, बिबट्या नसल्याचे वनविभागाकडून स्पष्टीकरण

बारामती, पुढारी वृत्तसेवा:  पिंपळी- झारगडवाडीच्या शीवेवरील शेतात दिसलेला प्राणी हा बिबट्या नसून तो तरस असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. दोन गावांच्या शीवेवर असलेल्या विठ्ठल जाधव या शेतकर्‍याला उसाच्या शेतात बिबट्यासदृश प्राणी दिसला होता. ही बातमी परिसरात पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. याबाबत ‘छत्रपती’चे संचालक संतोष ढवाण यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांना माहिती दिली. त्यानंतर लगेच वनपाल हेमंत मोरे, वनरक्षक बाळासाहेब गोलांडे, वनमजूर प्रकाश लोंढे आदींनी पाहणी केली.

पाऊस पडल्याने शेतजमिनीत प्राण्याच्या पाऊलखुणा स्पष्टपणे उमटल्या होत्या. पाऊलखुणा व ठशांच्या आधारे परिसरात वावर असलेला प्राणी बिबट्या नसून तरस असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. शेतकर्‍यांनी रात्री-अपरात्री शेतामध्ये पिकांना पाणी देण्यासाठी जाताना बॅटरी जवळ ठेवावी. वन्य प्राणी दिसल्यास हुसकावण्यासाठी काठी सोबत ठेवावी. प्राण्यावर हल्ला करू नये. तरस मनुष्याची शिकार करत नाही. परंतु लहान मुलांनी त्याच्याजवळ जाऊ नये. वनविभागाची मदत आवश्यक असल्यास 1926 अथवा 7507954466 या दूरध्वनी क्रमांकवर संपर्क साधावा, असे असे आवाहन वनरक्षक बाळासाहेब गोलांडे यांनी केले. छत्रपतीचे संचालक संतोष ढवाण, समाजसेवक हरिभाऊ केसकर, सोसायटीचे संचालक अशोकराव देवकाते, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष सुनील बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य अजित थोरात यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Back to top button