पुढारी ऑनलाईन डेस्क : Fifa World Cup : जागतिक फुटबॉलची सर्वोच्च संस्था असलेल्या फिफाने या वर्षाच्या अखेरीस कतारमध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला एक दिवस आधी सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही स्पर्धा 21 नोव्हेंबरऐवजी 20 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. विश्वचषक स्पर्धा 28 ऐवजी 29 दिवसांचा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर 101 दिवसांनी फिफाने या निर्णयाची घोषणा केली. जुन्या वेळापत्रकानुसार पहिला सामना नेदरलँड आणि सेनेगल यांच्यात होणार होता, मात्र आता नव्या वेळापत्रकानुसार पहिला सामना यजमान कतार आणि इक्वेडोर यांच्यात होणार आहे.
याआधीच्या वेळापत्रकानुसार, कतार आणि इक्वेडोर यांच्यातील अ गटातील हा सामना स्पर्धेतील तिसरा सामना होता. वास्तविक, परंपरेनुसार फिफा विश्वचषक स्पर्धेतील पहिला सामना यजमान संघ किंवा गेल्या वेळचा चॅम्पियन संघ खेळतो. अशा परिस्थितीत आता वेळापत्रकात बदल करून ती परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय फिफा कौन्सिलच्या ब्युरोने दिला. (Fifa World Cup)
फिफा समितीने नव्या निर्णयाला मंजुरी दिली. या निर्णयावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो आणि सहा महाद्वीपीय फुटबॉल संस्थांच्या अध्यक्षांचा समावेश होता. हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे फिफाने म्हटले आहे. गेल्या वर्षीपासून जगभरात तिकीट विक्री सुरू असताना बुधवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली.
फिफाने म्हटले, 'जुनी परंपरा कायम ठेवण्यासाठी वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, सेनेगल आणि नेदरलँड्स यांच्यातील गट अ मधील सामना 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता खेळवला जाईल. तर ब गटातील इंग्लंडविरुद्ध इराणच्या सलामीच्या सामन्यात कोणताही बदल झालेला नाही. या स्पर्धेच्या तयारीसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च करणाऱ्या कतारच्या आयोजकांनी लगेचच फिफाच्या निर्णयाचे स्वागत केले. (Fifa World Cup)
फिफाने घेतलेल्या निर्णयामुळे फुटबॉल चाहत्यांच्या प्रवासाच्या योजनेवर परिणाम होईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. मात्र या संदर्भात फिफाने स्पर्ष्टीकरण देताना आमच्या नन्या निर्णयामुळे कोणालाही कसलाही त्रास होणार नाही. फिफा ही परिस्थिती योग्यरित्या हाताळेल असा विश्वास दिला.
ग्रुप ए – कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलँड
ग्रुप बी – इंग्लंड, इराण, यूएसए, युरोपियन प्ले-ऑफ (वेल्स/स्कॉटलंड/युक्रेन)
ग्रुप सी- अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप डी – फ्रान्स, आंतरखंडीय प्लेऑफ 1 (पेरू/यूएई/ऑस्ट्रेलिया), डेन्मार्क, ट्युनिशिया
ग्रुप ई- स्पेन, आंतरखंडीय प्लेऑफ 2 (कोस्टा रिका/न्यूझीलंड), जर्मनी, जपान
ग्रुप एफ – बेल्जियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप जी – ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप एच – पोर्तुगाल, घाना, उरुग्वे, कोरिया