भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्षपदी आशिष शेलार

चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार
चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर भाजप नेते आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या दोघांना निवडीचे पत्र दिले आहे. चंद्रकांत पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लावण्यात आली आहे. तसेच राज्यातील ओबीसी समीकरणाचा समतोल साधूनच बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेलार यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिल्याचे सांगितले जात आहे.

मध्यंतरी बावनकुळे यांच्याविषयी असलेली पक्षश्रेष्ठींची नाराजी दूर झाल्यानेच त्यांना विधान परिषदेचे तिकीटही देण्यात आले होते. आता त्या पाठोपाठ बावनकुळे यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षाची माळ टाकण्यात आली आहे. बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेही निकटवर्तीय मानले जातात. सलग पंधरा वर्ष त्यांनी कामठी मतदारसंघातून विजय मिळविला होता. त्यानंतर ते राज्याचे ऊर्जामंत्री झाले होते. भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून बावनकुळे ओळखले जातात. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा दिल्यामुळे महापालिका निवडणुकीसह आगामी निवडणुकीतही भाजपला फायदा होईल आणि दुरावलेला ओबीसी समाज परत भाजपशी जुळेल, असे राजकिय विश्लेषकांचे मत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांचे २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट कापले

चंद्रशेखर बावनकुळे यांचे २०१९ ला विधानसभेच्या निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर राज्यातील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप राज्यातील आणि केंद्राच्या भाजप नेतृत्वावर सातत्याने होत होता. पंकजा मुंडे, विनोद तावडे यांनी राज्यातील राजकारणात पद्धतशीरपणे डावलले जात असल्याचे आरोप सातत्याने केले जात होते. पंकजा मुंडे यांना तर नव्या मंत्रिमंडळात डावलण्यात आले. २०१९ मध्ये बावनकुळे यांचे तिकीट कापण्यात आले. गडकरी आणि फडणवीस यांनी खूप प्रयत्न करूनही त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यावेळीही ओबीसी नेत्यांचे पंख कापले गेल्याचे आरोप झाले. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करीत पक्षनेतृत्वाने एका दगडात दोन पक्षी मारल्याचे बोलले जात आहे.

भाजप राज्यात सत्तेवर आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. तसेच गेल्या दहा वर्षांत भाजपचा प्रदेशाध्यक्ष ओबीसीमधून झालेला नाही. सुधीर मुनगंटीवार यांची मुदत २०१३ मध्ये संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्यानंतर रावसाहेब दानवे आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे सूत्रे आले. भाजपचा ओबीसी हा मोठा पाठीराखा आहे. मात्र, प्रमुख पदांवर त्यांच्यातील नेते नाहीत, असा संदेश जाऊ नये, म्हणून बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

 ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी  बावनकुळे यांची आक्रमक भूमिका

बावनकुळे यांनी ओबीसी आरक्षणाच्या वेळी भाजपची भूमिका आक्रमकपणे मांडली. तसेच २०१९ मध्ये त्यांचे विधानसभेचे तिकिट कापल्यानंतरही ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले आणि संघटनेचे काम करत राहिले. त्यानंतर त्यांना नुकतेच विधान परिषदेवर घेण्यात आले. आता त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे देण्यात आली आहे. याचाच अर्थ जे बावनकुळे स्वतःचे तिकिट २०१९ मध्ये मिळवू शकले नाहीत, त्यांच्यकडे आता तिकिटवाटपाची जबाबदारी आलेली आहे, असे मानले जात आहे. कारण तिकीट वाटपात प्रदेशाध्यक्षाचे मत विचारात घेतले जाते.

या पदासाठी आशिष शेलार यांचे नाव काही माध्यमांमध्ये चालविण्यात येत होते. पण ते मुंबईचे असल्याने आणि आता या पदासाठी मराठा चेहरा देणे योग्य नसल्याने देखील शेलार यांचे नाव शर्य़तीत नव्हते. मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने शेलार यांच्याकडे मुंबईची सूत्रे देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची आगामी काळात निवडणूक असल्याने शेलार यांचा उपयोग तेथे जास्त होणार असल्याने शेलार यांची नियुक्ती करण्यात आली, हे स्पष्ट आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news