कोल्हापूर : अपात्र लाभार्थांनी अन्नधान्य योजनेतून नाव कमी करून घ्यावे, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल : उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी | पुढारी

कोल्हापूर : अपात्र लाभार्थांनी अन्नधान्य योजनेतून नाव कमी करून घ्यावे, अन्यथा गुन्हा दाखल केला जाईल : उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी

कसबा बावडा : पुढारी वृत्तसेवा; ज्यांच्यासाठी शासनाची अन्नधान्य योजना आहे त्यांना अन्नधान्य मिळत नाही. पात्र नसणारे लाभार्थी शासनाच्या या योजनेचा लाभ घेतात ही शासनाची फसवणूक आहे. जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांनी स्वतःहून या योजनेतून आपले नाव कमी करून घ्यावे. अन्यथा त्यांचे नाव कमी करावे लागेल. प्रसंगी गुन्हाही दाखल केला जाईल असा इशारा पुरवठा विभाग, पुणेचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी यांनी दिला आहे. श्रीराम सेवा संस्थेच्या कार्यालयात शुक्रवारी कोल्हापूर जिल्ह्यातील १७०० रेशन दुकानदार प्रतिनिधींना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलकर्णी पुढे म्हणाले, प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित व्हावे. या माध्यमातून गावांत जनतेला सेवा मिळावी हा उद्देश आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या रास्त भाव दुकानदारांना आपल्या दुकानांमधून ४५० लोकांना सेवा देता येणार आहेत. पात्र नसणारे अनेक लाभार्थी शासनाच्या अन्नधान्य योजनेचा लाभ घेतात, प्रत्येक जिल्हा, तालुक्याला कोटा असतो, यामुळे गरजवंतास या लाभापासून वंचित राहावे लागते. जे लाभार्थी अपात्र आहेत त्यांनी स्वतः होऊन आपली नावे कमी करावीत. सर्व लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक करावे, अशा सूचनाही त्यांनी या प्रशिक्षण कार्यशाळेत दिल्या.

यावेळी बोलताना जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके म्हणाले, ज्यांचे आधार लिंक होत नाही त्यांची नावे शिधापत्रिकेतून कमी करावीत. जर आठवड्यात आधार लिंक केले नाही, तर त्या तालुका पुरवठा अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल.

काही रास्त भाव दुकानदारांना जागेचे भाडे परवडत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून रास्त भाव दुकान दुकानासाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात. रास्त भाव दुकानदारांना कोरोना योद्धा म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. आदी मागण्या यावेळी रास्त भाव दुकानदारांकडून करण्यात आल्या. यावेळी सहाय्यक पुरवठा अधिकारी सरस्वती पाटील, कोल्हापूर जिल्हा रास्तभाव दुकानदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, शहर अध्यक्ष राजेश मंडलिक, खजिनदार अशोक सोलापुरे यांच्यासह बारा तालुक्याचे रेशन दुकानदार उपस्थित होते.

गॅस सिलिंडर वजन करूनच घ्यावे

कार्यशाळेत बोलताना कुलकर्णी म्हणाले, गुरुवारी सांगली जिल्ह्यामध्ये एक सिलिंडर घेऊन जाणारा टेम्पो अडवण्यात आला. यातील सिलिंडरचे वजन तपासण्यात आले. प्रत्येक सिलिंडरमध्ये दोन ते अडीच किलो गॅस कमी होता. संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील गॅस ग्राहकांना विनंती आहे, गॅस सिलिंडर घेत असताना वजन करूनच घ्यावे ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

हेही वाचा

Back to top button